तालुक्यातील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नागरी सुविधांबाबत आमदार किरण सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधांचा आढावा घेताना अपुऱ्या राहिलेल्या नागरी सुविधा तत्काळ प्रामस्थांना देण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. त्यामध्ये स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन काम करताना अर्जुना प्रकल्पामुळे बाधित प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज मिळण्यासाठी पुनर्वसनमंत्र्यांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदीवर पाटबंधारे विभागातर्फे अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पांतर्गत अर्जुना नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील सुमारे ४ हजार ७३६ हेक्टर आणि लांजा तालुक्यातील सुमारे १ हजार ४३५ हेक्टर, असे एकूण सुमारे ६ हजार १७१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा लाभ राजापूर आणि लांजा तालुक्यातील अठरा गावांना त्याचा लाभ होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत धरण व कालव्यांच्या कामासाठी सुमारे ६६१.२७३ हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यापैकी ६५८.४७७ हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे. उर्वरित २.७६ क्षेत्राचे संपादन खासगी वाटाघाटीचे करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. अर्जुना धरणाच्या बांधकामामुळे तालुक्यातील करक व पांगरी ही दोन गवि बाधित झाली असून, या गावांमधील बाधित ग्रामस्थांचे करक-१, -करक-२, पाचल, पांगरी-येरडव संयुक्त असे चार गावठाणात पुनर्वसन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी श्री. बोरकर, प्रांतअधिकारी जीवन देसाई, जलसंधारण अधीक्षक अभियंता श्री. सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, तुषार बाबर, गटविकास अधिकारी श्री. जाधव, विलास चाळके, सरपंच सुरेश ऐनारकर, सरपंच करक अमर जाधव, सरपंच पांगरी खुर्द सुनील जाधव, माजी सरपंच पांगरी खुर्द, संदीप बारसकर, अध्यक्ष पाणी वापर संस्था तळवडे आदी उपस्थित होते.
विविध दाखल्यांच्या अडचणी – ठिकाणी पुनर्वसनाच्या प्रकल्पग्रस्तांना विविध प्रकारच्या १८ नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याबाबतचा आमदार सामंत यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये सविस्तरपणे आढावा घेतला. त्यामध्ये अपुऱ्या राहिलेल्या सुविधांसह ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्काळ मार्गी लावण्याचेही आमदार सामंत यांनी या वेळी सूचित केले. येथील जनतेच्या विविध दाखल्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी तत्काळ विशेष कॅम्प लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रशासनाला दिल्या.