भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान वेडापिसा झाला आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर अंधाधूंद गोळीबार केला जात आहे. जम्मू आणि काश्मीर, पंजाबमधील सीमेवरील गावांमध्ये उखळी तोफा आणि तोफगोळे डागण्याचे प्रयत्न पाकिस्तानने केले. एअर स्ट्राईकनंतर ७ मे च्या मध्यरात्रीनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये क्षेपणास्त्र डागत हल्ले करण्याचा प्रयत्न देखील पाकिस्तानने केला. मात्र भारतीय लष्कराने तो हाणून पाडला. या पार्श्वभूमीवर भारत- पाक सीमेवर युद्धाचे ढग दाटले आहेत. पाकिस्तानकडून सीमेवर मोठ्याप्रम ाणावर फौजा एकत्रीत केल्या जात असून रणगाडे आणि तोफा सज्ज झाल्या आहेत. पाकिस्तानच्या या हालचाली पाहून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही.
पाकिस्तानने पुन्हा हल्ले केले तर आणखी एक एअर स्ट्राईक किंवा त्यापेक्षाही कठोर कारवाई करू, असा इशारा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. त्यामुळे सीमेवरील तणाव चांगलाच वाढल्याचे दिसते आहे. भारताने ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानी नेते घाबरले आहेत. गेल्या ८ दिवसांपासून सीमेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करणार पाकिस्तानच्या पेकाटात भारताने केलेल्या एअर स्ट्राईकने लाथ घातली. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताला पोकळ धमक्या देणे सुरू केले आहे.
एअर स्ट्राईक मान्य – दरम्यान भारताने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पाक व्याप्त काश्मीर आणि पंजाबमध्ये भारतीय सैन्यदलाने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने हा हल्ला केल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहाबाज शरीफ यांनी मान्य केले असून भारताच्या हल्ल्यात ३७ नागरिक मृत्यू पावल्याची माहिती अधिकृतपणे पाकिस्तानने दिली आहे.
जम्मूमध्ये गोळीबार – पाकिस्तान भारताला चोख उत्तर देईल असे शाहाबाज शरीफ यांनी सांगितले. बुधवारी दुपारनंतर पाकिस्तानातील काही संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछ आणि राजोरीमध्ये अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये ११ भारतीय नागरिक मारले गेले. त्यामध्ये ४ मुलांचा समावेश आहे. भारतीय सैन्याने देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा भारतीय लष्काराने केला आहे.
पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न – एअर स्ट्राईकनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने ७ मेच्या मध्यरात्रीनंतर उत्तर आणि पश्चिमेकडील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. पाकिस्तानने १५ पेक्षा जास्त भारतीय लष्करी तळावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंदर, लुधियाना, आदमपूर, भट्टींडा, चंदीगड, नल, फलोदीप, उत्तरलाई आणि भूज येथे ड्रोण आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
संरक्षणप्रणाली नष्ट – मात्र भारताने पाकिस्तानचा प्रयत्न असफल ठरविला. पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावले. पाकिस्तानचा हल्ला परतवून लावताना गुरुवारी सकाळी भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. त्यासाठी इस्त्राईलकडून मिळालेल्या हार्पी ड्रोनचा वापर करण्यात आला. एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली भारताने आधीच सीमेवर तैनात केली आहे. पाकिस्तानने क्षेपणास्त्रांचा हल्ला करता ही प्रणाली सक्रीय करण्यात आली. भारतीय सशस्त्र दलाने अनेक ठिकाणी हवाई संरक्षण लढा आणि प्रणाली नष्ट करण्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केला. भारताने लाहोर, सियालकोट, कराची येथील हवाई संरक्षण प्रणानी नष्ट करुन पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे.
९ ठिकाणी ड्रोन हल्ले – लाहोर, कराची, रावळपिंडीसह ९ ठिकाणी भारताने ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. अटक, रावळपिंडी, चकवाल, गुजरानवाला, लाहोर, बहावलपूर, मियानो, धार आणि कराची येथेही ड्रोन हल्ले करण्यात आले.
युद्धाच्या हालचाली – बिधरलेल्या पाकिस्तानने सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. रणगाडे मोठ्या प्रमाणावर सीमेवर आणण्यात येत आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील पाकच्या हद्दीत असलेली गावे रिकामी करण्यात आली आहेत. तसेही भारताच्या एअर स्ट्राईकनंतर येथील नागरिकांनी गाव सोडले होतेच.
घाबरुन लपले – पाकिस्तानातील नागरिक घाबरले असून त्यांनी घर सोडून बंकर (मोठ मोठे खोदलेले खंदक)चा आश्रय घेतला आहे. भारत पुन्हा हल्ला करेल या भीतीने पाकिस्तान नागरिक ग्रासले आहेत. वॉटर स्ट्राईकमुळे पाण्याची टंचाई झाली आहे. त्यामुळेही कोंडी झाली आहे.
सीमेवर युद्धाचे ढग – या सर्व पार्श्वभीवर सीमेवर युद्धाचे ढग दाटले आहेत. हालचाली वेगात सुरू आहेत. दरम्यान भारताने पाकिस्तानला जशासतसे उत्तर देऊ असे सुनावले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वेळ पडल्यास भारत आणखी एक हल्ला (एअर स्ट्राईक ?) करण्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरुच असून गरज वाटल्यास पुन्हा अॅटॅक करू शकतो असे सुचक संकेत संरक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये १०० अतिरेकी मारले गेल्याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली.