रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून सुमारे १६ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर असून त्यातून सुरू असलेल्या दुरुस्तीचे ९० टक्के काम आता पूर्ण झाले आहे. महिनाभरामध्ये उर्वरित १० टक्के काम पूर्ण होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पानवल धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर यावर्षीपासून तेथून पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर धरण पूर्ण भरल्यावर जवळपास १० टीएमसी पाणीसाठा उपयोगात येणार आहे. या जुन्या धरणाला लागलेल्या गळतीमुळे फक्त दोन टीएमसीच पाणी शहरासाठी वापरात येत होते.
गळतीमुळे डिसेंबर-जानेवारीमध्येच धरण तळ गाठत असे. आता पाण्याचा अधिकाधिक वापर होणार आहे त्यामुळे आगामी काळात रत्नागिरीकरांना पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे. पानवल धरण हे शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र, धरणाच्या भिंतींना गेलेले तडे आणि मोठ्या प्रमाणात होणारी गळती यामुळे पाणी साठवण क्षमतेवर गंभीर परिणाम झाला होता. ही गळती थांबवण्यासाठी आणि धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी १६ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
ग्रॅव्हीटीने शहराला पाणीपुरवठा – या धरणातून ग्रॅव्हीटीने शहराला पाणी पुरवठा होत असल्याने, वीज बील शून्य येते. सध्या नवीन पाईप लाईनचे १३ किमीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. फक्त पोमेंडी बाणेवाडी आणि महालक्ष्मी मंदिराजवळील डोंगरात दोन टप्प्यातील जवळपास तेराशे मीटरची पाईपलाईन शिल्लक आहे.
तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प – हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता, कारण गळतीमुळे दरवर्षी लाखो लिटर पाणी वाया जात होते. सद्यःस्थितीत धरणाची मुख्य भिंत सुरक्षित करण्यात आली. आता केवळ गेट्सची किरकोळ दुरुस्ती आणि शेवटच्या टप्प्यातील सुशोभीकरण अशी कामे शिल्लक आहेत.

