मागील वर्षभरापासून, महामार्गावर वाहनांची रेलचेल वाढली असून, वाहनांना आग लागण्याचे प्रकार सुद्धा अनेक समोर आले आहेत. अचानक धावत्या गाडीतून धुराचे लोट येऊन काही क्षणातच गाडी संपूर्ण जळून त्याची खाक झाल्याचे निदर्शनास आले आहे. लहान वाहनासह अवजड वाहनांच्या बाबतीत देखील अशा घटना घडताना दिसत आहेत.
परशुराम घाटात मुंबई-गोवा महामार्गावर बारा चाकी ट्रकच्या समोरच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा बर्निंग थरार पाहायला मुंबई-गोवा महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही आहे. मात्र अचानक पेट घेतलेल्या या ट्रक मधील सर्व सामान व कॅबिनेट संपूर्ण जळून खाक झाले आहे.
एमएच ०८, एच २२९१ हा ट्रक चिपळूणहून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीकडे वाहतूक करत होता. परशुराम घाटातील विसावा पॉईंट येथे पोहोचताच ट्रकच्या इंजिनमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. त्याचवेळी चालक व वाहकाने सावधगिरी बाळगत ट्रक मधून बाहेर उडी मारली. त्यानंतर काही क्षणातच ट्रकच्या समोरील भागाला मोठ्या स्वरुपात आग भडकली. या आगीत ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
महामार्गावर घडलेल्या या बर्निंग ट्रकच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या दलाने काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नुकसानाचा पंचनामा केला आहे.