मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू करण्यात आले असून, परशुराम देवस्थान, खोत आणि कुळ यांच्यामध्ये मिळालेल्या मोबदल्यावरून निर्माण झालेले वाद काही संपुष्टात आलेले नाहीत. या स्थानिक वादामुळे परशुराम घाटातील काम स्थगित होते. प्रशासनाने सूचना देऊनही ठेकेदार कंपनी या भागामध्ये सततच्या अडवणुकीमुळे आणि स्थानिकांच्या वादामुळे काम करण्यास तयार नाहीत.
परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे २०१६ पासून रखडलेल्या कामाचा श्रीगणेशा होणार आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत २३ डिसेंबरपासून रस्त्याच्या कामला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ डिसेंबरला पूर्ण मार्किंग केले जाणार असून, प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यापूर्वी पेढे-परशुराम संघर्ष समितीसोबत संयुक्त बैठक झाल्याने पोलिस बळाचा वापर करावा लागणार नसल्याचे समजते आहे.
त्या पार्श्वभूमीवर परशुराम घाटात प्रत्यक्षरित्या कामास सुरुवात करण्यापूर्वी, प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी तहसीलदार, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, पेढे-परशुराम संघर्ष समिती सदस्य, अॅड. पेचकर, दोन्ही ठेकेदार कंपन्या, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक आदींची संयुक्त बैठक घेतली आणि त्यानंतर या कामाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
अति वृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामध्येच आता रस्ता ढळू लागल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे़. अॅड. पेचकर यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये आवश्यकता वाटल्यास पोलिस यंत्रणेचा वापर करून काम सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु सध्याच्या स्थितीवरून वादाची परिस्थिती निवळल्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात परशुराम घाटाच्या रस्त्याच्या कामाला आरंभ होणार आहे.