मागील दहा दिवसांपासून दरडीच्या धोक्यामुळे बंद असलेला परशुराम घाट अखेर वाहतुकीस खुला करण्यात आला असून त्यासाठी विशेष नियमावली देखील आखण्यात आली आहे. घाटात सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत एकेरी मार्गावर केवळ अवजड वाहतूक सुरू राहणार आहे. तर सायंकाळी सात ते सकाळी सहापर्यंत घाट बंद ठेवण्यात येणार आहे.
घाटातील वाहतूक सुरू करताना विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार घाट केवळ अवजड वाहनांसाठी सुरू राहणार असून, हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी व शेल्डीमार्गे सुरू राहणार आहे. परशुराम घाटाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड, रत्नागिरी, पोलिस व परिवहन विभाग तसेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवले होते. परशुराम घाटातील वाहतूक सुरू करण्यासाठी लोटे व खेर्डी येथील कंपन्या, शाळा-महाविद्यालयांनीही निवेदने दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नियम, अटी घालून घाटातील वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
सायंकाळी सहापासून सातपर्यंत अवजड वाहनांच्या एकेरी वाहतुकीबाबतचे नियोजन त्या त्या विभागातील उपविभागीय दंडाधिकारी खेड व चिपळूण, उपविभागीय पोलिस अधिकारी खेड व चिपळूण आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे करायचे आहे. दोन अवजड वाहनांमध्ये किमान ५० ते १०० मीटर इतके अंतर असावे. वाहनांचा वेग ताशी २० ते ३० किलोमीटर असावा.
घाटात दरडप्रवण भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिथे जेसीबी, क्रेन, पोकलेन, रुग्णवाहिका, रस्सी, टॉर्च, अग्निशमन वाहन आदींची व्यवस्था असणे गरजेचे आहे. जबाबदार अधिकाऱ्यांसह पुरेसे मनुष्यबळ २४ तास मदत व बचावकार्यासाठी ठेवावे. घाटातील वाहतूक कधी सुरू अथवा बंद राहील, याबाबत घाटाच्या सुरुवातीस व घाटाच्या शेवटी तशा आशयाची वाहतुकीची चिन्हे व ठळकपणे दिसणारे फलक लावण्यास सांगण्यात आले आहे. घाटात राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २४ तास लक्ष ठेवावेत. घाटात संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असून, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा सूचना दिल्या आहेत.