परशुराम घाटातील कातळ फुटता फुटेना,सुरूंग लावण्यास परवानगीची प्रतीक्षा…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी दिवसातील पाच तास वाहतूक बंद ठेवली आहे. या कामात घाटाच्या मध्यभागी असलेल्या कातळाचा अडथळा निर्माण झाला आहे. कातळ फोडण्याचे काम २४ तास ब्रेकरच्या साहाय्याने सुरू आहे; परंतु अतिशय कठीण असलेले हे कातळ फुटता फुटत नसल्याने तेथे तात्पुरत्या स्थितीत बायपास तयार करण्याचे नियोजन ‘ठेकेदार कंपनीकडून केले गेले.गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे रखडले होते. जमिनीचा मोबदला व मालकीवरून वाद निर्माण झाल्याने हे काम अडचणीत आले होते; मात्र आता घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. चिपळूण हद्दीतील इंगल इन्फ्रा कंपनीमार्फत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. केवळ एमआयडीसीची पाईपलाईन बदलण्याचे व तेथील काँक्रिटीकरणाचे काम शिल्लक आहे. शिवाय घाटात दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत उभारणीचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे; परंतु खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले आहे. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्यान कामाचा वेग कमी झाला आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या पूर्वी घाटात चौपदरीकरणातील एकेरी, मार्ग सुरू करण्यावर भर दिला आहे.

त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान घाटातील वाहतूक बंद ठेवली आहे. चिरणी लोटे पर्यायी मागनि वळवण्यात आली आहे. या कालावधीत परशुराम घाटातील जुन्या मार्गावर भराव करून काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मागील ३ दिवस भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्याच जोडीला घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेला कातळ दोन ब्रेकरच्या साहाय्याने फोडण्यात येत आहे. कातळ फोडण्यासाठी सुरूंग लावण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु जवळच लोकवस्ती असल्याने परवानगी मिळालेली नाही. परिणामी, हे कातळ फोडण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे. त्यावर उपाय म्हणून तात्पुरत्याङ्ग स्थितीत बायपास रस्ता तयार करण्याचे नियोजन केले जात आहे. बायपास रस्त्यावरून वाहतूक सुरू असताना कातळ फोडण्याचे कामही केले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे.परशुराम घाटाच्या मध्यभागी कठीण कातळ असल्याने तो गतीने फोडण्यात अडचणी येत आहेत. या ठिकाणी सुरुंग लावण्याची गरज असते; परंतु तेथे सुरुंग लावण्यास मान्यता न मिळाल्याने ब्रेकरच्या साहाय्याने कातळ फोडण्याचे काम सुरू आहे. या कामास वेळ लागणार असल्याने पावसाआधी वाहतूक सुरळीत करण्यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, असे अभियंता कल्याण टोलवेज कंपनी शिवाजी कांबळे यांनी सांगीतले.