माती परीक्षणानंतरच बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो किंवा नाही हे स्पष्ट होईल : ना. सामंत

198
Refinery project at Barsu can be done only after soil test

नियोजित बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या ठिकाणी सर्वेक्षण सुरू असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. त्या ठिकाणी बोअरवेल मारण्याचे काम सुरू आहे. तिथे काँक्रिट टाकून पिलर टाकले जाणार असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतेही सर्वेक्षण सुरू नाही. फक्त माती परीक्षणाचे काम सुरू आहे. ते पुढील २ आठवड्यात पूर्ण होईल. हे माती परीक्षण जगातल्या सर्वात मोठ्या लॅबमध्ये केले जाईल. त्यानंतरच बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो किंवा नाही याबाबत निर्णय होईल, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना दिली. याआधी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खा. विनायक राऊत यांनी जमीन खरेदी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशी करू आणि दोषींना शासन होईल असेही ना. सामंत यांनी सांगितले. गेले ५ दिवस राजापूर तालुक्यातील बारसूच्या माळावर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंदोलन छेडत आहेत.रिफायनरी प्रकल्प नको असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. शुक्रवारी या आंदोलकांना दूर करण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. यात काही आंदोलक जखमी झाले. आंदोलकही आक्रमक असल्याने त्यांच्यावर अटकेच्या कारवाया करण्यात आल्या. गुन्हे मागे घ्यावेत अशी आग्रही मागणी आंदोलकांच्या माध्यमांतून करण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला खा. विनायक राऊत हेही उपस्थित राहिले होते. प्रशासन आणि पोलीस ३५३ सारखे गुन्हे आंदोलकांवर दाखल करतील अशी शंका आंदोलकांनी व्यक्त केली होती. मात्र हे गुन्हे लावणार नाही अशी खात्री ना. सामंत यांनी यावेळी दिली.

या बैठकीत खा. विनायक राऊत यांनी बारसू येथील जमीन दिल्लीपासूनच्या जम्मूपर्यंतच्या लोकांनी खरेदी केल्या आहेत असा मुद्दा मांडला. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणाबाहेर येथे जमीन खरेदी केलेली असेल तर ती कशाप्रकारे घेतली? का घेतली? याची २ दिवसात चौकशी होईल. बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. महावितरणच्या ज्या अधिकाऱ्यांच्या नावावर जमीन खरेदी झाली आहे त्या अधिकाऱ्यांची तातडीने मुख्यालयात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ना. सामंत यांनी सांगितले. आंदोलनातील घडामोडींसंदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना माहिती दिली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही काही माहिती हवी असल्यास त्यांची वेळ घेऊन जिल्हाधिकारी, आयुक्त त्यांच्याशी बोलतील, असेही ना. सामंत यांनी सांगितले.