रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने, भविष्यात मार्गावर काही धोका उद्भवू नये यासाठी संरक्षक भीत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मार्गाचे काम सुरु असताना अचानक दरड कोसळल्याने त्या ढिगाऱ्याखाली जेसीबी चालकाच्या मृत्यू देखील ओढवला.
त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळून एका कर्मचार्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तेथे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यावर प्रचंड भर दिला जात आहे. कोसळलेली दरड आजही तशीच असली तरी भविष्यात कोणताही धोका निर्माण होवू नये यासाठी येथील प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग व संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यामार्फत विशेष काळजी घेतली जात आहे.
आणि पाऊस सुरु होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पावसाळ्यापूर्वी या घाटातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लागावे यादृष्टीने वेगवान प्रयत्न सुरू आहेत. घाट परिसरात सुमारे पाचशे मीटर लांब व सहा मीटर उंच संरक्षक भिंत उभारली जात आहे. त्यापैकी ९३ मीटरच्या भिंतीचे काम दिवसरात्र काम करून युद्धपातळीवर सुरू आहे.
दरड हटविणे व या घाटातील रस्त्याच्या कामासाठी हा महामार्ग किमान दीड महिना बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा विचार केला जात आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग व प्रशासनामार्फत नियोजन केले जात आहे. तुर्तास लोटे ते चिरणीमार्गे कळंबस्ते या पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे. त्यासाठी या रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. परंतु या पर्यायी मार्गामुळे अंतर वाढत असून, नागरिकांमध्ये त्यामुळे नाराजगी दिसून येत आहे.