शहरातील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सकाळी आठ वाजता मधोमध खचले. दुपारी पावणेतीन वाजता दोन स्पॅनमधील ३० गर्डर लाँचरसह कोसळले. भूकंपासारखा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन पिलर मधोमध खचल्यानंतर ज्या उपाययोजना करणे गरजेचे होते, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बहादूरशेख नाका ते युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सुमारे १.८१ किलोमीटर लांबीचा सर्वाधिक मोठा उड्डाणपूल आहे. त्यासाठी ४६ पिलर उभारले आहेत. आठ महिन्यांपासून उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत जोखमीचे असल्यामुळे गर्डर बसविण्यासाठी बराचसा कालावधी घेतला. नव्याने चढवलेले गर्डर सकाळी ८ वाजता मधोमध खचून कॉक्रिटचा काही भाग खाली कोसळला. मोठा आवाज झाल्याने नागरिकांची पळापळ झाली. त्याकडे दुर्लक्ष झाले. आज दुपारी खचलेले गर्डर पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची बहादूरशेख नाका परिसरात गर्दी होती.
त्याचवेळी हे गर्डर कोसळले. त्यानंतर बहादूरशेख नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली. निकृष्ट कामावरून लोक अधिकाऱ्यांसमोर आपला संताप व्यक्त करीत होते. त्याच दरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी प्रथम गर्दी कमी केली. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.