कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये संक्रमण वाढण्याचा धोका जास्त असल्याने रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वे बंद केली. कोकण रेल्वेच्या मार्गावरील पहिली सुरु झालेली गाडी म्हणून सर्वच रत्नागिरीकरांची या रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीवर भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या गुंतणूक आहे म्हणयला हरकत नाही. सर्वसामन्यांना आर्थिकरीत्या परवडणारी रत्नागिरीकारंची गाडी.
त्यामुळे रत्नागिरीतील रेल्वे मार्गांवर जी स्टेशन येतात तेथील नागरिकांनी रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी लवकरात लवकर पुन्हा सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे. रत्नागिरीवासीयांनी हक्काची रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी त्वरित सुरू करावी,अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेड्ये यांच्याकडे दिले आहे. त्यावेळी मनसे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनी हे निवेदन दिले आहे. तसेच जर हि गाडी लवकरात लवकर सुरु करण्यात आली नाही, तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
खेड तालुक्यामध्ये सुद्धा रिपाईचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी सुद्धा रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी त्वरित सुरु करण्याबाबत निवेदन दिले आहे. सुरुवातील या गाडीचा मार्ग फक्त रत्नागिरी ते दादर असा होता. परंतु मध्यंतरी ती गाडी मडगावपर्यंत करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरीची हक्काची गाडी विभागली गेली. त्याचप्रमाणे सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये सुपरफास्ट गाडी नसूनसुद्धा, प्रवाशांकडून मात्र सुपरफास्टचे तिकीट दर आकारून, एक प्रकारची पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी सुरु करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.