स्वच्छतेच्यादृष्टीने एसटी बसमध्ये राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. बस अस्वच्छ असतील तर थेट आगार व्यवस्थापकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. रत्नागिरी विभागातील बस स्वच्छ ठेवल्या जात असल्याने अजून विभागातील एकाही आगार व्यवस्थापकावर कारवाईचा बडगा उगारला गेला नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे एसटींची तपासणी होते का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. स्वच्छ एसटी स्थानक मोहिमेनंतर एसटी बसेस स्वच्छतेसाठी आता नवीन मोहीम सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. बसच्या स्वच्छतेबाबत महामंडळाने गांभीयनि ही मोहीम राबवण्याचे निश्चित केले आहे.
यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महामंडळाने दिला आहे. महात्मा गांधी जयंतीच्या एक दिवस आधी अर्थात १ ऑक्टोबरपासून एसटी बसेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. बसमधील अस्वच्छतेवर महामंडळाने लक्ष केंद्रीत केल्याने बसेसची स्वच्छता प्राधान्याने केली जात आहे. आगार व्यवस्थापकांवर गाड्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाकडून सर्व विभागांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात हा नियम कागदावर असावा कारण, आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पथकांद्वारे गाड्यांची तपासणी तरी होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार परिपत्रक पाठवून, बैठका घेऊन, सूचना देऊनही बसेस स्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. यामुळेच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.