शहरात आलेल्या महापुराला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. शंभर वर्षांतील सर्वाधिक मोठा पूर जुलै २०२१ मध्ये आला होता. महापुरानंतर केवळ ७२ तासांत शहर पुन्हा उभे राहिले. त्यामुळे या महापुराने संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य आम्हाला दिले, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. शासनाने पुढील ४ दिवसांत पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. गेल्या २४ तासांत चिपळूणमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, चार वर्षांपूर्वीच्या कटू आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. २१ जुलै २०२१ ला सायंकाळी सुरू झालेल्या पर्जन्यवृष्टीने हाहाकार माजवत गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक १४ फुटांपेक्षा जास्त पाण्याने उंची गाठून नदीपात्राजवळची गावे पाण्याखाली गेली होती. रात्री उशिरा शहरामध्ये पाणी भरल्यामुळे एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दहाजणांचा बळी गेला. महापूर थांबल्यानंतर मदतकार्य सुरू झाले. शासनस्तरावरून तसेच सामाजिक संस्थांनी मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली नाही. पुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक शासकीय स्तरावर समिती नेमण्यात आली. या समितीने अनेक उपाय सुचवले. यापैकी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन सुरू झाले.
वाशिष्टी नदीतील गाळ काढून तो बिल्डरांच्या मोकळ्या जागेत टाकण्याचा वार्षिक कार्यक्रम गेली चार वर्षे सुरू आहे. नलावडा बंधारा येथून शहरात पाणी येऊ नये यासाठी तेथे कोट्यवधी रुपये खर्च करून भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. या पलीकडे नागरिकांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. येणाऱ्या कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक तसेच जिल्हा प्रशासन दक्ष असले तरीही येथील नागरिकांमध्ये अशा संकटांना सामोरे जाण्याची निर्माण झालेली मानसिकता व धैर्य यांचा राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून तसेच प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आलेले कौतुक तेवढेच महत्त्वपूर्ण ठरले आहे. आजवरच्या शहराच्या महापुराच्या इतिहासात नागरिकांना कोणत्याही साथीच्या आजाराला अशा महाप्रलयानंतर सामोरे जावे लागलेले नाही. यावरूनच अशा संकटांना सामोरे जाण्याची मानसिकता व त्यासाठी आवश्यक असलेल्या करावयाच्या कामांबाबत शहरातील नागरिक सक्षमपणे स्थानिक प्रशासनाबरोबर कार्यरत असल्याचे दिसून येते.
या उपाययोजना गरजेच्या – डोंगरभागातील वृक्षतोड थांबवावी. नाले, पन्हे आणि गटारांची खोली वाढवून रुंदीकरण करावे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. नदीलगत बांधकामाला परवानगी देऊ नये. नवीन इमारत बांधताना पार्किंगची सक्ती करावी. पाणथळ भागात इमारती बांधू नयेत, मातीचा भराव करू नये. महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था असावी