कोल्हापूर जिल्ह्यासह राजापूर, कुडाळ आणि कर्नाटकात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय राजू शेलार (वय २५, मूळ रा. भगतसिंग चौक, जवाहरनगर, सध्या रा. राशीन, ता. कर्जत) या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे. त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या १० लाख २५ हजार रुपये किंमतीच्या तब्बल १५ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर त्याच्या साथीदाराचाही शोध सुरु आहे. याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या वाहन चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सुचना दिल्या होत्या.
तपासादरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अक्षय शेलार याने त्याच्या साथीदारांसह कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण व कर्नाटक भागातून म ोटरसायकली चोरल्याची व तो शाहू टोल नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरिक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी अक्षय शेलार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली बुलेट त्याने वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली..
१० गुन्हे उघडकीस : पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, अक्षय शेलार याच्या चौकशीत त्याचा साथीदार विजय गुरव (रा. शिरगाव, ता. शाहुवाडी) याच्या सहकार्याने पन्हाळा, पेठवडगाव, शाहुवाडी, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, राजापूर (जि. रत्नागिरी), कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि सांगली, निपाणी (कर्नाटक) आदी भागातून मोटरसायकली चोरल्याचे सांगितले.

