सांगलीसह कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय अर्जुन मोरे (वय २८, रा. गोंदीलवाडी, ता. पलूस), संभाजी राजाराम जाधव (३०, रा. विकास कारखान्याजवळ, पलूस) या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. दोघांनी रत्नागिरी येथील मंदिरांतील चोरी तसेच सांगलीमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. संशयित आरोपींकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिंक माहितीनुसार सांगलीतील राम मंदिरजवळील संजोग कॉलनीत राहणाऱ्या सम्राट विश्वनाथ माने (वय ५३) यांच्या बंगल्यात दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी चोरी झाली होती.
याबाबत माने यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायकं निरीक्षक सिकंदर वर्धन, कर्मचारी हणमंत ऋतुराज होळकर यांचे पथक लोहार, सुशील. मस्के, अभिजित ठाणेकर, मालमत्तेच्या गुन्ह्याचा तपास करत असताना दोघेजण चोरीची भांडी व सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडीतील फ़ल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचला होता.
दोघांना पकडले – मिळालेली माहिती खरी ठरली. संबंधित दोघे त्या ठिकाणी आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांची चोरी उघड झाली. त्यांच्या दुचाकीवर असलेल्या गोणपटात अनेक वस्तू सापडल्या. त्याचप्रमाणे त्यांच्या खिशात सोन्याचे मंगळसूत्र सापडले. संशयित आरोपी अक्षयच्या खिशात चार पदरी सोन्याचे मंगळसूत्र, गोणपाटात चांदीचे, तांब्याचे व पितळेचे सामान मिळाले अशी माहिती तपास करणाऱ्या पोलिसांनी पत्रकारांना दिली.
मंदिरात चोऱ्या – संशयित आरोपी अक्षय मोरे याला आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिरात चोरी केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याने संभाजी जाधवच्या मदतीने रत्नागिरीत मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र व हार तसेच २९ सप्टेंबर २०२५ रोजी चोरला होता. तसेच अर्जुनवाड येथील मंदिरातील गणेशमूर्ती चोरली होती.

