राजापूर-लांजा नागरिक संघ आणि मनोहर हरी खापणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण आणि पश्चिम घाट परिसर जोडणाऱ्या अणुस्कुरा घाट आणि उगवाई मंदिर परिसरात वड, पिंपळ, आंबा, काजू यांसारखी विविध प्रकारची दीर्घायू असलेली शंभरांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. अणुस्कुरा घाट मार्गातील भूस्खलन रोखण्यासह पर्यावरण जतन आणि संवर्धनाला विविध प्रकारची झालेली लागवड एक प्रकारे साहाय्यभूत ठरणार आहे. अणुस्कुरा घाट आणि येरडव येथील ऊगवाई मंदिर परिसरामध्ये आज झालेल्या वृक्षलागवडीवेळी जागतिक कीर्तीचे चित्रकार विजयराज बावधनकर, राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, गणेश चव्हाण, वृक्षमित्र अमर खामकर, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणाऱ्या अनेक पायवाटा आहेत. मात्र, कालपरत्वे रहदारी कमी झाल्याने या पायवाटा दुर्लक्षित आहेत. त्यापैकी एक राजापुरातील येरडव ते अणुस्कुरा ही ऐतिहासिक शिवकालीन पायवाट. या पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन मंदिर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलला ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित राहिला. रायपाटण येथील श्री मनोहर खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून श्रमदान करीत या परिसराची डिसेंबर महिन्यामध्ये स्वच्छता केली. त्यावेळी येरडव ते अणुस्कुरा या पायवाटेवरील शिवकालीन हा ऐतिहासिक ठेवा दृष्टिक्षेपात आला आहे. त्या भागातील ऊगवाई मंदिर परिसर आणि अणुस्कुरा घाट या भागामध्ये ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
तरुणाईही सरसावली – लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतल्याची माहिती येरडव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उमेश दळवी यांनी दिली. यामध्ये येरडव, कारवली, अणुस्कुरा या गावांमधील तरुणांचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.