28.3 C
Ratnagiri
Tuesday, February 24, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

रत्नागिरी नगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर

रत्नागिरी पालिकेने आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा...
HomeRatnagiriपोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

एशियन ब्लॅक ड्रोंगो अर्थात् कोतवाल झाडावर आपल्या अस्तित्वाचे साम्राज्य पसरवू पाहत होता.

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई, पक्ष्यांच्या सुरेल आवाजाने स्वागत, पक्षी निरीक्षकांचे डोळे, दुर्बिणी, मोबाईल आणि कॅमेराच्या गन क्षणार्धात झाडांच्या शेंड्यांवर सुरांकडे स्थिरावल्या. काळ टोपी हळद्या, नीलकर्ण खंड्या, तपकिरी डोक्याचा तांबट आणि वनघुबडाच्या जोडीच्या दर्शनाने पक्षी निरीक्षक चांगलेच सुखावून गेले. वन विभाग आयोजित पक्षीमित्र संमेलन २०२६ची सांगता थेट क्षेत्रीय स्तरावरील भेटीने आणि पक्षी निरीक्षणाने आज झाली. सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे, पक्षीमित्र विराज आठल्ये, निकिता शिंदे यांच्यासह राज्यभरातून आलेले पक्षीमित्र, पक्षी निरीक्षक आज एकत्रितपणे पक्षी निरीक्षण, जंगल वाचनाचा आनंद घेत होते. सकाळी सात, साडेसात वाजता पोमेंडी येथील देवराईत सर्वजण पोहचले. या सर्वांचे स्वागतच पक्ष्यांच्या सुरेल आवाजाने जणू झाले. काजरा या वृक्षाची माहिती मोरे यांनी सर्वांना दिली. समोरच मलबार पॉईंट हॉर्नबिलने आपली झलक दाखवून पक्षी निरीक्षणाची सुरुवात केली. एशियन ब्लॅक ड्रोंगो अर्थात् कोतवाल झाडावर आपल्या अस्तित्वाचे साम्राज्य पसरवू पाहत होता.

चिरक्या आवाजात राग व्यक्त करत अन्य पक्ष्यांना झाडावरून हाकलू पाहत होता. त्याला न जुमानता ब्लॅकहेडेड बार्बेट अर्थात् तपकिरी डोक्याचा तांबट दोन्ही दिशांना मान हलवत ‘कुटुर, कुटुर..’ आपल्या जोडीदाराला साद घालत होता. शिळकरी कस्तुराची जणू अस्तित्व दाखवल्यासारखी इंडियन आयोरा अर्थात् सुभग शीळ घालत होता. फुलटोच्या, फूलचुक्या, सूर्यपक्षी, एशियन कोयल अर्थात् मादी कोकीळ, पानांच्या हालचालीत ‘आम्हीही आहोत म्हटलं..’ हे सांगून राहिली होती. काळटोप्या हळद्याचा सूर परिसरात घुमत होता. त्याच्या सुरात सूर मिसळत बहुधा त्याची जोडीदारीण त्याला आपलं हृदय बहाल करत असावी. पुढे वहाळाच्या खबदाडीत पुलाच्या खालच्या बाजूला झाडाला यु आकारात कवटाळलेल्या वेलीच्या चौकटीत जंगल वुड आऊल अर्थात् वनघुबडाने प्रथम दर्शन दिले. ती त्या वनलाकडात, परिसरात रंगाने मिसळून गेली होती; पण सर्वांवर नजर ठेवून बसली होती. थोड्या वेळातच तिचा जोडीदार तिच्याजवळ आला. ते प्रेमीयुगुलांप्रमाणे आपल्यातच रममाण झालेले होते.

पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यामध्ये अचानक ब्लू इअर्ड किंगफिशर अर्थात् नीलकर्ण खंड्या डुबकी मारून गेला. सगळ्यांच्या नजरा दुर्बिण, मोबाईल आणि कॅमेरे त्याला टिपण्यासाठी सरसावले. पुन्हा तो आला. हलकीशी सूर मारून गेला. त्याचा तो निळा रंग चमकून गेला. पुन्हा तो सर्वांच्या समोर एखाद्या मॉडेलप्रमाणे आला. आता मात्र तो बराच वेळ ऐटबाजपणे वाहत्या पाण्यातील फांदीवर बसून होता. एकाचवेळी मान आणि शेपूट उडवण्याची त्याची लकब नजरेतून आणि कॅमेऱ्यातून सुटली नाही. कॅटवॉक करणाऱ्या मॉडेलने आपली पोज द्यावी, असे ते भासत होते. वर झाडावर जंगल बदामचे लालसर फळ फुटून काळ्या बिया खाली सांडलेल्या होत्या.

बुलबुलची, सुभगची शीळ – झाडाच्या छोट्या फांदीवर घरटे लटकत होते. तो फ्लॉवरपेकर अर्थात् फुलटोच्या होता. ब्लॅकनेपेड मोनार्च अर्थात् जांभळी लिटकुरी तिचे अस्तित्वही जाणवून गेले. परतीच्या मार्गावर दयाळाची, बुलबुलची, सुभगची शीळ कानी पडली.

RELATED ARTICLES

Most Popular