26.1 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeDapoliदापोलीत संपामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल…

दापोलीत संपामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल…

या संपामुळे दापोली आगाराचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे दापोलीत प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. सकाळपासूनच एसटी बसेस न सुटल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. या संपामुळे दापोली आगाराचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अजूनही संपाबाबत शासनाकडून तालुक्यात ठिकठिकाणी बसथांब्यावर प्रवासी बसची प्रतीक्षा करत ताटकळत होते. त्यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश होता. या संपात ३२० चालक, वाहक सहभागी होते, तर २० कर्मचारी कार्यरत होते. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संप आहे.

त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील १३ संघटनेच्या कृती समितीने संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. मंगळवारी सकाळपासून दापोली आगारातील पहाटे सुरू होणाऱ्या बससेवेवर कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे परिणाम झाला आहे.

सकाळपासूनच्या अनेक फेऱ्या धावल्याच नाहीत. बसस्थानकाबाहेर कर्मचारी कामावर हजर न होता धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. एसटी वाहतूक कोलमडल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मिळेल त्या खासगी वाहनाने दापोलीपर्यंत पोहचावे लागले. विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. बहुतेक प्रवासी रिक्षा, वडाप सेवा अशा खासगी सेवांकडे धाव घेत होते. एसटी कर्मचारी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यामुळे सर्व आगारव्यवस्था कोलमडून गेली होती..

RELATED ARTICLES

Most Popular