चिपळूण-कासे (कोकरे नायशी, वडेर कळबुंशीमार्गे) ४० वर्षे नियमित सुरू असणारी एसटी फेरी चिपळूण आगरातून बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या विरोधात पालक व विद्यार्थी चिपळूण आगारात २६ जानेवारीला ठिय्या आंदोलन करणार आहेत. चिपळूण-कासे ही एसटी पूर्वी चिपळूण आगरातून सायंकाळी ४.४५ वाजता चिपळूणहून सोडण्यात येत होती. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ७ वाजता कासे-मुंबई अशी परतीचा प्रवासासाठी सोडण्यात येत होती. एसटी बस दोन वर्षे चिपळूण-कासे-पेंढाबे व्हाया माखजन करण्यात आली; मात्र आता भारमान नसल्याचे कारण देत चिपळूण आगराने ही गाडी बंद केली. यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. या एसटीमधून असुर्डे, कोकरे, नायशी, वडेर कळंबुशी, कासे गावातील शेकडो विद्यार्थी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेमध्ये शिक्षणासाठी येत होते. हे विद्यार्थी सावर्डे येथून ५ वाजता परतीचा प्रवास करत असत.
महाविद्यालय ५ वाजता सुटल्यावर तब्बल दोन तास सावर्डे एसटी थांब्यावर परतीच्या प्रवासासाठी वाट पाहत राहावे लागत आहे. येथील शेकडो विद्यार्थी वर्गास पास मिळवण्यासाठी चिपळूण स्थानकात अभ्यासक्रमाचे नुकसान करून जावे लागत आहे. याबाबत विद्यार्थी व पालकांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली असून, चिपळूण-कासे ही एसटी फेरी, विद्यार्थ्यांना सावर्डेत पासाची सुविधा मिळावी, अशी मागणी उपसरपंच संदीप घाग यांनी केली आहे.
पास सुविधा सावर्डेत सुरू करा – सावर्डे परिसरातील ५४ गावांतील विद्यार्थी शिक्षण घेत असून, शेकडो पासधारक आहेत. येथील विद्यार्थी सावर्डे एसटी निवाराशेडमध्ये एसटी महामंडळाकडून पास देण्यात येत होते; मात्र दोन वर्षांपूर्वी महामार्गावर असणारी ही निवाराशेड महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे तोडण्यात आली. त्यानंतर ही सुविधा बंद झाली आहे. ही सुविधा पुन्हा सावर्डेत सुरू करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.