दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरात मोकाट कुत्र्यांना विष घालून मारण्यात आल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनयाचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे रत्नागिरी शहर अंतरिम संयोजक ज्योतिप्रभा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात दोन दिवसांपूर्वी जवळपास ४० कुत्री मृतावस्थेत आढळून आले होते. यांना जेवणामध्ये विष घालून मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत अज्ञाताविरोधात शहर पोलिस स्थानकात प्राणी मित्रांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारही दिली होती. सध्या पोलिस चौकशी सुरू आहे. याबाबत आता आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून, न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी आम आदमी पार्टीमार्फत पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मुक्या प्राण्यांसोबत शहरात घडलेला प्रकार हा दुर्दैवी आहे. नगर परिषदेने कार्यक्षेत्रात प्राणी स्थिती नियंत्रण नियमावली २००१ ची अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून येत आहे. आपण याबाबत माहिती अधिकाराचा वापर केला होता मात्र, त्याला उत्तर व्यवस्थित दिले गेले नसल्याचे ज्योतीप्रभा पाटील यांनी सांगितले. जो प्रकार झाला त्याला रत्नागिरी नगर परिषदही जबाबदार असल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला.
या सर्व विषप्रयोगाच्या प्रकाराबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनयाचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये नगर परिषदेने प्राणी जन्म नियंत्रण कलमांच्या कलम ४ अंतर्गत प्राणी जन्म नियंत्रणासाठी एक समिती स्थापन केली आहे का? न.प.च्या उणिवांवर विशेष भर देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असे मुद्दे या याचिकेत समावेश करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच हे कृत्य झाल्याने संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी दखलपात्र गुन्हा करावा यासाठीही प्रयत्न केले आहेत.