गुहागर बायपास रस्त्यालगत पाच दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कानी आल्याने त्याने आवाजाचा दिशेने धाव घेतली असता, तिथे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्याने त्वरित पोलिसांना संपर्क साधला. या घटनेची पोलिसांनी देखील गंभीरपणे दखल घेत या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
चिपळूण शहरातील उक्ताड ते पाग दरम्यान असलेल्या गुहागर बायपास रस्त्यालगत एका पिराजवळ हे अर्भक आढळून आले. पाच दिवसांचा अर्भक असून एका कपड्यामध्ये गुंडाळलेल्या स्थितीत तेथे ठेवण्यात आले होते. या रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका तरुणाने येणाऱ्या अर्भकाचा आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले तर तिथे लहान मुल रडत होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच त्या अर्भकाला कामथे रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. अर्भकाची प्रकृती सुस्थितीत आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील एका दर्ग्याजवळ ५ दिवसाचे नवजात अर्भक आढळून आले होते. वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ तपास सुरू केला. ३ दिवसामध्येच पोलिसांच्या प्रयत्नाला यश आले आहे. या नवजात बालिकेच्या आईचा पोलिसांनी शोध घेतला असून मंगळवारी तिला ताब्यातही घेण्यात आले आहे.
पोलीस पथकातील पो. नाईक प्रणाली शिंदे यांना “त्या” महिलेबद्दल काही माहिती कानावर आली होती, त्यामुळे शिंदे त्या महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. त्यानुसार अखेर त्या महिलेचचं हे अर्भक असल्याचे निश्चित झाले. आणि त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. पो. नाईक प्रणाली शिंदे यांच्या या लक्षवेधी कामगिरी मुळे पोलीस वरिष्ठ अधिकारी बारी आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.