जिल्हा पोलिसदलाने कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी एक मोठा उपक्रम राबवला आहे. ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या सरकारी वाहनांमध्ये अत्याधुनिक जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. हा उपक्रम पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला असून, पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या थेट नियंत्रणाखाली वाहनांमार्फत गस्त घातली जाणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता जिल्ह्यातील गस्त घालणाऱ्या सर्व वाहनांवर थेट निरीक्षण करता येणार आहे. कोणत्याही घटनेच्यावेळी सर्वात जवळील सरकारी वाहन घटनास्थळी तत्काळ पाठवले जाईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गस्त अधिक प्रभावीपणे केली जाईल. वाहनांचा वापर अधिक नियंत्रित व पारदर्शक पद्धतीने होईल. गुन्हे रोखणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि नागरिकांना वेळीच मदत करण्यास मोठी मदत होणार आहे. पोलिसदलाने सर्व वाहने ‘जीपीएस’ प्रणालीने जोडल्यामुळे हे शक्य होणार आहे.
यापूर्वी देखील पोलिसदलामार्फत पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाईटराउंड अर्थात पोलिस गस्त घातली जात होती; परंतु त्यामध्ये कोणत्या भागात गस्त घातली गेली, हे स्पष्ट होत नव्हते. त्यानंतर ई-पेट्रोलिंग सुरू झाले. यामध्ये पोलिसांनी हद्दीमध्ये ठिकाणे निश्चित करून तेथे टॅग लावण्यात आले. जो कर्मचारी गस्तीवर असतो त्याने या टॅगला ई-मशीन लावून गस्त घातल्याचा पुरावा द्यायचा होता; परंतु फार काळ ही यंत्रणा चालली नाही. पोलिस अधीक्षक बगाटे यांनी वेगळी संकल्पना राबवून गस्तीमध्ये पारदर्शकता आणली आहे. पोलिसदलाच्या सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवली आहे. यामुळे प्रत्येक वाहनावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर असणार आहे. आपत्कालीन स्थितीत तत्काळ घटनास्थळी दाखल होणे शक्य होणार आहे.
संभाव्य गुन्हे रोखता येणार – पोलिस दलातील वाहनांवर जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्याने त्याचे लोकेशन वरिष्ठांना जाणून घेता येते. हद्दीत प्रभावी गस्त घातली जाणार आहे. आवश्यक ठिकाणी वेळेत धाव घेऊन संभाव्य गुन्हे रोखता येणार आहेत.