जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा रासायनिक प्रदूषणाचा गंभीर प्रश्न उफाळून आला आहे. एमआयडीसीमधील एका नाम ांकित कंपनीच्या गटारातून काळसर रंगाचे घातक रसायन मिश्रित सांडपाणी थेट मुख्य सांडपाणी वाहिनीत मिसळताना आढळून आले आणि ते उघड्यावर वाहू लागल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ही घटना उघडकीस येताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यांत आले. मात्र, उघड्यावरून वाहाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली असून, पर्यावरण आणि मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
सर्वत्र संताप – लोटे एमआयडीसी परिसरात वारंवार अशा प्रकारे उघड्यावर सांडपाणी सोडले जात असूनही, प्रदूषण नियंत्रण महामंडळ नेमकी काय भूमिका बजावत आहे, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्याने ग्राम स्थांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका संशयास्पद वाटते. कारण वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू असूनही केवळ पंचनामे आणि अहवालापुरती मर्यादित कारवाई केली जाते. परिसरातील जैवविविधतेवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनसे आक्रमक भूमिकेत – या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी संबंधित कंपनीचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. या रासायनिक सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसर धोक्यात आला आहे. प्रशासन डोळेझाक करत असल्यास मनसेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
आता कारवाई होणार की पुन्हा मौन? – लोटे एमआयडीसीमधील वाढते रासायनिक प्रदूषण, त्यावर संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष, आणि स्थानिक नागरिकांची वाढती नाराजी यामुळे संपूर्ण घटनेने गंभीर वळण घेतले आहे. यावर प्रशासन तत्काळ आणि प्रभावी पावले उचलते का, की नेहमीप्रमाणे फक्त अहवालांमध्येच गोष्टी अडकून राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.