देवरूखजवळील बुरंबी येथे टॉवरलाईन जोडून स्वतंत्र ईएचव्ही पॉवरहाऊस उभारावे, ही मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभा अधिवेशनात ठळकपणे मांडून ऊर्जामंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी तातडीने विभागीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय, नगरपंचायत असलेले देवरूख शहर आणि परिसरातील वाढती नागरी लोकसंख्या तसेच उद्योगधंद्यांना अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी क्रांती व्यापारी संघटनेने हा प्रश्न हाती घेतला. विजेचा हा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. सध्या देवरूखला आरवली येथील पॉवरहाऊसवरून तब्बल ५५ किमी लांबचा विद्युतपुरवठा केला जातो. ही लाइन घनदाट जंगल, डोंगरदऱ्या, नद्या ओलांडून आल्याने वारंवार बिघाड होतो आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. या पार्श्वभूमीवर देवरूखजवळील बुरंबी येथे टॉवरलाईन जोडून स्वतंत्र ईएचव्ही पॉवरहाऊस उभारावे, अशी मागणी क्रांती व्यापारी संघटनेने केली होती.
त्यासाठी संगमेश्वर येथे उपविभागीय अभियंत्यांची भेट घेतली. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने रत्नागिरी सर्कलमार्फत विभागाकडे व विभागाने तो प्रस्ताव प्रकाशगड मुख्यालयात पाठवला. त्यामुळे देवरूखच्या वीजसमस्येवर ठोस तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्रांती व्यापारी संघटनेचे पदाधिकारी संदीप वेल्हाळ, भाऊ शिंदे व मुन्ना थरवळ यांनी हा विषय सातत्याने लावून धरला. राहुल टाकळे यांनी अधिकारी यांच्यात दुवा साधून मोलाची भूमिका बजावली. कृष्णकुमार भोसले यांनी अतिशय मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन केले व आपल्या स्तरावरून सुद्धा पाठपुरावा केला.
उद्योगधंद्यांना नवे बळ – हे प्रत्यक्षात उतरले तर देवरूखमध्ये २४ तास अखंड वीजपुरवठा होणार असून, उद्योगधंद्यांना नवे बळ मिळणार आहे. याच अनुषंगाने भविष्यात एमआयडीसी विस्ताराची दिशाही क्रांती व्यापारी संघटनेने आखली असून, त्याचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या पूर्ण कार्यवाहीकरिता संगमेश्वर येथील फारुक गवंडी आणि तत्कालीन देवरूख येथील अधिकारी गायकवाड यांनी केलेल्या सहकार्याबद्दल देवरूखवासीयांनी आभार मानले.