प्रसारभारतीने देशभरातील दूरदर्शनची अॅनालॉग पद्धतीची प्रादेशिक सहप्रक्षेपण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये राजापूरच्या केंद्राचा देखील समावेश आहे. राजापूरचे केंद्र ३१ ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता विश्वास आरभुवणे यांनी दिली.
केंद्र सरकारने डिजिटल युगात अॅनलॉग सेवा कालबाह्य झाल्याने ही सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०१८ सालापासून सुरू करण्यात आली असून, देशभरातील सुमारे १४०० केंद्रांवरून दूरदर्शनचे डीडी आणि प्रादेशिक अशा दोन चॅनेलचे कार्यक्रम सहक्षेपित केले जात होते. नंतर चॅनेल्सची संख्या वाढविण्यात आली. ही सरकारी चॅनेल्स मोफत पाहायला मिळत होती.
रामायण, महाभारत मालिकेच्या काळात या चॅनेल्सना लोकानी डोक्यावर घेतले होते. मात्र, आर्थिक उदारीरकरणाच्या धोरणानुसार खासगी चॅनेल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे दूरदर्शनची मक्तेदारी तेथेच संपली. स्पर्धेच्या जमान्यात दूरदर्शननेही डिटीएचची कास धरल्यामुळे जुन्या अॅनलॉग केंद्राचे महत्त्व कमी झाले.
पूर्वी प्रत्येक घरावर अॅन्टेनाच्या काड्या दिसत, पण आत्ता त्या नामशेष होऊन तिथे डिश दिसू लागल्या आहेत. त्यामुळेच प्रसारभारतीला अॅनलॉग सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पहिल्या टप्यामध्ये एकूण ६०० केंद्रे बंद करण्यात आली. मागील वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हि कार्यवाही थांबली होती, परंतु, आता राहिलेली सर्व केंद्रे येत्या ३१ मार्चपर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील ४५५ केंद्रांपैकी १५२ केंद्रे ३१ ऑक्टोबरपर्यंत, तर १०९ केंद्रे ३१ डिसेंबरपर्यत आणि १९४ केंद्रे ३१ मार्च २०२२ पर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे आरभुवणे यांनी स्पष्ट केले आहे.