अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड अंतःकरणाने विसर्जन केले जाणार आहे. सुमारे ३६ हजार ४०५ घरगुती व ६१ सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात येणार आहे. चतुर्थीला पावसाचे सावट लक्षात घेऊन तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पोलिस दलातर्फे ग्रामीण व शहरी भागातही गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीला जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ४१७ घरगुती गणरायांचे आगमन झाले. १२६ सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये १३ हजार ८४४ घरगुती, तर सात सार्वजनिक दीड दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. त्यानंतर सात दिवसांच्या गौरी विसर्जनात एक लाख एक हजार ३२९, तर दहा दिवसांच्या वामनद्वादशीला जिल्ह्यात एक हजार ७०२ गणरायांना निरोप देण्यात आला. उद्या अनंत चतुर्दशीला ३६ हजार ४०५, तर ६१ सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात येणार आहे.
गणेशाच्या आगमनालाच पावसाच्या सरी बरसत होत्या. तशा त्या अद्यापही सुरूच आहेत. त्यामुळे मूर्तीवर प्लास्टिक टाकून व मोटारीमधून किनाऱ्यावर आणण्याचा भक्तांचा कल वाढला आहे. पावसाचे सावट लक्षात घेऊन भाट्ये व मांडवीकिनारी लवकरात लवकर गणरायाला निरोप देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दीड दिवस आणि वामनद्वादशीला विसर्जनाला चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कुटुंबातील सर्व सदस्य मांडवी किनाऱ्यावर गणरायाला निरोप देण्यात मग्न होते. आरती धूपारती झाल्यानंतर भावपूर्ण वातावरणात गणेशाला निरोप देण्यात आला होता.
भाट्ये समुद्रकिनारी घाट – अनंत चतुर्दशीला पालिकेने निर्माल्यासाठी मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी घाट तयार केले आहेत. मोटारीतून येणाऱ्या घरगुती मूर्तीची संख्या लक्षात घेऊन पोलिसदलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रमाणे ग्रामीण भागात पोलिस पाटलांनाही प्रशासनाने सूचना देऊन योग्य नियोजन करण्यात आले आहे.