प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट धुके आणि गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये झालेली कमालीची वाढ आदी विविध कारणांमुळे काजूच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. उत्पादन कमी असल्याने दरामध्ये चांगली वाढ होईल, अशी बागायतदारांना आशा होती; मात्र ती फोल ठरली आहे. गतवर्षी हंगामाच्या सुरवातीला काजू बीचा प्रतिकिलो १३८ रुपये असलेला दर यावर्षी केवळ १२० ते १२५ रुपये आहे. त्यामुळे काजू बागायतदार अन् शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सुरुवातीला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, वादळी वारा, सातत्याने राहिलेले धुके यामुळे काजूचा मोहोर काळा पडला होता. त्यामुळे काजूच्या उत्पादनामध्ये घट झाली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचाही काजू बी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे काजू बी विक्रीला चांगला दर मिळेल, अशी आशा होती; मात्र हंगामाच्या सुरवातीपासून दर घसरलेला आहे. सुरवातीलाच १२०-१२५ रुपये दर मिळत आहे. काजू बीचा आकार लहान असल्यास किलोला ११० रुपयेच दिले जातात. भविष्यात दरामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.