दिवाळीमध्ये फराळाला विशेष महत्त्व आहे. राजापुरात रेडीमेड मिळणाऱ्या फराळापेक्षा घरच्याघरीच बनवलेल्या फराळाकडील कल वाढला आहे. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या फराळ बनवण्यासाठी लगबग वाढली आहे. मात्र महागाईमुळे फराळाच्या वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने खमंग फराळाचा गोडवा तिखटच लागणार आहे. दिवाळीत फराळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. दुकानामध्ये उपलब्ध होणाऱ्या रेडीमेड फराळासोबत घरगुती फराळाला अधिक मागणी असल्याने घरोघरी फराळ बनवले जात आहेत.
प्रत्येक घरातून फराळाचा खमंग वास येत आहे. रेडीमेड फराळाला असलेली मागणी लक्षात घेऊन बचतगटाच्या महिला सरसावलेल्या आहेत. त्यांनी फराळाच्या ऑर्डरही स्वीकारल्या आहेत. नोकरी करणाऱ्या गृहिणींकडून रेडीमेड फराळासाठी नावनोंदणीही केली गेलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंपासून चैनीच्या वस्तूंपर्यंत सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये फराळाला लागणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे.
फराळासाठी लागणारा मैदा, तेल, बेसन, शेंगदाणा, रवा, खोबरे, चणाडाळ आदी वस्तूंचे दर २५ टक्क्यांहून अधिक झालेले आहेत. त्यामुळे फराळाच्या किमतीही महागल्या आहेत. हाच फराळ विकत घेण्यासाठी गेलेल्यांना चढ्या दरांनी घ्यावा लागतो. त्यामुळे काही लोकांनी घरीच फराळ करणे पसंत केले आहे. तरीही वाढत्या दरामुळे चकल्या, लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी आदी चवीने गोड असलेल्या फराळातील पदार्थांची चव तिखटच लागणार आहे.