कडवई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वारंवार तक्रार नोंदवून देखील रात्रपाळीला एकही डॉक्टर हजर राहत नसल्याने ग्रामस्थां मधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक होणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली असताना रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णाची गैरसोय होत आहे. दोन वर्षांपूर्वी विंचू दंश झालेल्या रुग्णाला डॉक्टर नसल्याने उपचारा अभावी मनस्ताप सहन करावा लागला होता. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी या केंद्राला टाळे ठोकले होते.
त्यावरून त्यांना ३५३ कलमाखाली अटक करून कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी येथील वैधकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानी दारूच्या बाटल्यांचा खच् ही आढळून आला होता. या घटनेनंतर राजकीय दबावापोटी तब्बल वीस दिवसानंतर मनसे जिल्हाध्यक्ष व सहकारी यांचेवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करून कारवाई करण्यात आली होती. याची आठवण जितेंद्र चव्हाण यांनी करून दिली. त्यानंतर वर्षभरातच त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
त्यानंतर पुन्हा एकदा अशीच स्थिती दिसून आल्याने मनसे पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्या केंद्रात रुग्ण घेऊन आलेले सामाजिक कार्यकर्ते मोहन कुंभार यांनाही येथे डॉक्टर नसल्याचे आढळून आले. ही बाब त्यांनी मनसे जिल्हाध्यक्ष चव्हाण यांच्या कानावर घातली.
चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्या कानावर घातली. या बाबत तात्काळ ठोस कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल दणका दिला जाईल असा इशारा आरोग्य विभागाला दिला आहे. त्यावेळी आठल्ये यांनी याबाबत चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असे सांगितल्याचे चव्हाण यांनी सांगितले.