26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeKhedबनावट नोटांची छपाई चिपळुणात झाल्याचे उघड

बनावट नोटांची छपाई चिपळुणात झाल्याचे उघड

पोलिसांनी सात लाख १० हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या.

बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिपळुणातील दोघांना मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी मिरजोळी येथील एका दुकानावर धाड टाकून तेथून ४२ हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. तसेच चिपळुणातील आणखी एकाला आणि खेडमधील एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एकूण चौघांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बनावट नोटा प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये बनावट नोटा उपलब्ध होत असल्याची चर्चा होती.

दोनशे व पाचशे रुपयांच्या या नोटा असून, त्यांतील काही नोटांचे रंग फिकट पडल्याचे प्रकारही काही नागरिकांना दिसून आले आहेत. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत मिरजोळी (ता. चिपळूण) येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट नोटा छापल्या जात होत्या. बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्यासाठी शिरळ आणि पाचाड येथील दोघे तरुण काही दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांना त्याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी पनवेल येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात आली. त्यानंतर क्राईम ब्रँचचे पोलिस चिपळुणात दाखल झाले. त्यांनी मिरजोळी येथील पत्र्याच्या दुकानावर छापा टाकला. तेथे त्यांना ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. तसेच पनवेल येथे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांनी साथिदारांची नावे पोलिसांना दिली. त्यानुसार चिपळूणमधून एकाला आणि दुसऱ्याला खेडमधून ताब्यात आले आहे. संशयिताकडून पोलिसांनी सात लाख १० हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्या दोघांना पोलिसांनी मुंबईला नेले.

RELATED ARTICLES

Most Popular