राज्यातील जनतेला मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणच्या गतिमान विकासासाठी दळणवळणासारख्या पायाभूत सुविधा आणि पर्यटनवाढीच्या उद्देशाने कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातील ५ रेल्वेस्थानकांचे काँक्रिटीकरण, स्थानक परिसर विकास व सुधारणा करणे या कार्यक्रमाचे ऑनलाईन भूमिपूजन झाल्याचे जाहीर करतो, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ रेल्वेस्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभीकरण या कामांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याच्यादृष्टीने रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळणवळण यांसह मूलभूत सोयी-सुविधा जनसामान्यांना सुलभतेने उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशाच्या, राज्याच्या गतिमान विकासात रस्त्यांची व्यापक सुविधा ही महत्त्वाची बाब असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील ८०० रेल्वेस्थानकांच्या कायापालटाच्या विकासात रस्त्यांची व्यापक सुविधा ही महत्त्वाची बाब असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील ८०० रेल्वेस्थानकांच्या कायापालटाच्या उपक्रमाची अलीकडेच सुरुवात केली आहे. राज्यातील ४४ स्थानकांचा त्यात समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड या ५ स्थानकांचा त्यात समावेश आहे.
रेल्वेस्थानकाना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. यामुळे कोकणाच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल. पर्यटकांना, स्थानिक रहिवाशांना या माध्यमातून चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न योजनेचे संचालक किरण सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहूल पंडित, रेल्वेचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमोल ओठवणेकर, जनक धोत्रेकर आदी उपस्थित होते.