माय झयानी बसस्थानकाचो गोटो केल्यान, अरे या सरकारचे करायचे काय, अरे या आमदारांचे, खासदारांचे करायचे काय? खाली डोके वर पाय, अशा घोषणा देत गेली सहा वर्षे रखडलेल्या हायटेक एसटी बसस्थाकाच्या नवीन बांधकामाविरुद्ध मनसेने धडक मोर्चा काढला. या वेळी म्हशींचे प्रतीकात्मक मुखवटे दाखवून सर्वांचा निषेध व्यक्त केला. येत्या २० दिवसांमध्ये काम सुरू झाले नाही तर या बांघकामाच्या जागेवर म्हशी आणून या कामाचा गोठा केल्याचे घोषित केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी कामगार सेनेचे सुनील साळवी, वंडकर, मनीष पाथरे, अमोल श्रीनाथ, छोटू खामकर, चव्हाण आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
शासकीय विश्रामगृहाजवळून हा मोर्चा काढण्यात आला. सिव्हिल, पालिका, जिल्हाकारी कार्यालयावरून हा मोर्चा हायटेक एसटी बसस्थानकाच्या ठिकाणी आणण्यात आला. या वेळी एसटीचे अभियंता मोहिते, पाटील उपस्थित होते. शहर पोलिसांनी येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यात जमावबंदी लागू असला तरी मोर्चाला प्रांताधिकाऱ्यांनी रितसर परवानगी दिली होती. विभाग नियंत्रकांनी आज येथे उपस्थित राहायला हवे होते; परंतु आता काही नाही. पुढच्यावेळी त्यांना आम्ही प्रोटोकॉल काय असतो ते बरोबर शिकवू, असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला.रत्नागिरी हायटेक एसटी बसस्थानकाचे मागील २ वर्षापासून कोणतेही काम पूर्णत्वास गेलेले नाही. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून जनतेचा असंतोष वाढत चालला आहे.
कारण, प्रवाशांना ऐन पावसात बाहेर उभे राहून एसटीची वाट बघावी लागत आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय ही अतिशय गंभीर बाब आहे. रखडलेल्या या प्रश्नाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकशाहीच्या मार्गाने आज मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. या वेळी म्हशींचे प्रतीकात्मक मुखवटे दाखवून या कृतीचा निषेध करण्यात आला. सर्वच लोकप्रतिनिधींवर अनेक आरोप करत आगपाखड केली. त्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. येत्या २० दिवासांमध्ये बसस्थानकाचे काम सुरू झाले नाही तर या ठिकाणी म्हशी आणून या कामाचा सर्वांनी गोठा केल्याचे जाहीर करू, असा इशारा मनसेने दिला.