25 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriगौतमी नदीच्या काठावर बांधणार संरक्षक भिंत

गौतमी नदीच्या काठावर बांधणार संरक्षक भिंत

पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात भरत असल्याने त्याचा फटका या रस्त्याला बसत होता.

रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी मंदिर मार्गावरील गौतमी नदीच्या काठावर संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागाची धूप थांबवण्यास मदत होणार असून या मार्गावरील रस्त्यालाही मजबुती मिळणार आहे. गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीनंतर या ठिकाणी भक्तांना जाता यावे, यासाठी रस्त्याची निर्मिती केली. कारण, पूर्वी बैलगाडीचा रस्ता होता. त्यानंतर रस्ता झाला. या रस्त्याच्या शेजारून नदी वाहत असल्याने या रस्त्याची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली आणि तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता तयार झाला; परंतु पावस चौकातून सुटल्यानंतर गौतमी नदीकाठचा रस्त्याचा भाग अनेक ठिकाणी ढासळत होता.

कारण, पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात भरत असल्याने त्याचा फटका या रस्त्याला बसत होता. त्यामुळे या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. काठावरील रस्ता ढासळत असल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याला नदीकिनारी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, असा प्रस्ताव पालकमंत्री यांच्याकडे देण्यात आला होता. अखेर त्या भागाची गरज लक्षात घेता भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी गौतमी नदीच्या काठावर रस्त्याची धूप थांबवण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात कामाला सुरवात होणार आहे. या संरक्षक भिंतीमुळे नदीच्या पुराच्या पाण्यापासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या संदर्भात पावसचे उपसरपंच प्रवीण शिंदे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांची ही मागणी होती. या संरक्षक भिंतीच्या माध्यमातून रस्त्याचे संरक्षण होणार असून, या परिसरातील शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा धोका कमी होणार आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक, ग्रामस्थ व पर्यटकांनाही फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular