मागील काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावरील अपघातांचे प्रम ाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पहायला मिळत आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांकडून कोणतीही कोणतीही खबरदारी न घेता मालवाहतूक राजरोस सुरू आहे. त्यातच जीवघेणे अपघात होत आहेत, पण प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना होत नसल्याने मंगळवारी जयगड रस्त्यावर खंडाळा सामाजिक संस्थांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. मार्गावरून डंपरद्वारे होणारी अवजड वाहतूक रोखून धरत ग्रामस्थांनी मागे न हटण्याचा निर्धार केला. आंदोलनकर्त्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरवात झाली. सुरूवातीला वाहनांची संख्या कमी असल्याने त्रास जाणवला नाही. मात्र मागील १० वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीला सुरुवात झाली. तुलनेने रस्ता जसा आहे तसाच आहे.
रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, खराब रस्ते व चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे या रस्त्यावर महिन्यातून किमान एका तरी निष्पाप नागरिकाचा बळी जात आहे. यावर प्रशासनाकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसण्यात येत नाही. अनेकदा या रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प असते. एकंदरीत या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. मंगळवारी दुपारनंतर जयगड-वाटद मार्गावर ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. संतप्त ग्रामस्थांनी या मार्गावरून होणारी डंपरची मालवाहतूक रोखून धरली. ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने पोलीस फौजफाटाही तातडीने दाखल झाला. या आंदोलनामध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला. जोपर्यंत या वाहतूकीला लगाम घातला जात नाही तोपर्यंत न हटण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला.