रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड जिल्ह्यामध्ये महापुराने अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, काही जणांच्या घरातील सर्वच वाहून गेले. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, त्याचे पंचनामे शासनातर्फे वेगाने करण्यात येत असून, आजच्या स्थितीला जिल्ह्यातील चिपळूण, खेड पूरग्रस्त भागातील २५ हजार पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांनी मदत मिळण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी बँक डिटेल्स लवकरात लवकर द्यावेत असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसानग्रस्तांमध्ये ४५०० दुकानांचा समावेश असून, ५००० वाहनांचे पंचनामे आतापर्यंत करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १२००० रुपयांचे सानुग्रह अनुदानासाठी कुटुंब पात्र झाली असून, त्यांची संपूर्ण यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना साहित्य इतर खरेदीसाठी पहिले अनुदान म्हणून ५००० रु. देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे महापुरामध्ये वाहून आणि पूर काळामध्ये जे मृत्युमुखी पावले आहेत, त्यांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखाचा चेक पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. जखमींना अनुदान देण्यास सुरुवात केलेली असून, पंचनाम्याच्या वेळी काही नागरिकांकडे बँक डिटेल्स उपलब्ध नसल्याने ते देऊ शकले नाहीत. तर काही लोकांची महत्त्वाची कागदपत्रे भिजून गेली तर काही जणांची कागदपत्रे पुरामध्ये वाहून गेली आहेत, त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे.
नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी ज्यांच्याकडे बँक डिटेल्स उपलब्ध झाले असतील त्यांनी ती माहिती त्वरेने सादर करावी, नुकसानग्रस्त नागरिकांनी मदत मिळण्यासाठी, सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.