जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू होत आहे. परवानाधारक आणि बेकायदेशीर पर्ससीन नौकांची तसेच पर्ससीन नौकांवार बेकायदेशीर बूम (हायड्रोलिक विंच) बसवून करण्यात येणारी बेकायदेशीर मासेमारी नौकांची माहिती द्यावी, अशी मागणी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघाने निवेदनाद्वारे सहाय्यक मत्स्य आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ज्या नौकांचा ट्रॉलिंगचा परवाना असताना त्यावर पर्ससीन सामुग्री बसवून मासेमारी केली जात आहे. तसेच मिनी पर्ससीन (रिंगसिंग) या नौकांवर शासकीय नियमानुसार बंदी घालून कोणत्या स्वरूपाची कारवाई करणार, याची सविस्तर माहिती द्यावी.
ज्या पर्ससीन नौकाचा पर्ससीन परवाना संपला आहे. तरी अशा बेकायदेशीर शेकडो पर्ससीन नौका मासेमारीसाठी तयार आहेत. तसेच ज्या नौकांचा ट्रॉलिंग परवाना आहे; पण अशा नौकांवर बेकायदेशीर पर्ससीन सामुग्री, पर्ससीन जाळी, बूम (हायड्रोलिक विंच) व्हीआरसीवर कामगार (खलाशी) ची नोंदणी केलेली असते त्या नोंदीपेक्षा जास्त कामगार (खलाशी) असतात, अशा नौकांवर कारवाई करण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे. जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदरजेटी येथे बाहेरून येणाऱ्या नौकांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी.
बाहेरून येणाऱ्या नौकांमुळे रत्नागिरीतील स्थानिक मच्छीमारांच्या मच्छीला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे स्थानिक नौकामालकांचे बाहेरून येणाऱ्या नौकांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. सागरी सुरक्षा रक्षक अशा बाहेरून येणाऱ्या नौकांना सहकार्य करतात. त्यामुळे असे प्रकार वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी त्या नौकांचा नंबर, नाव, फोटो जाहीर करावा. बेकायदेशीर नौका, रत्नागिरी (मिरकरवाडा, साखरीनाटे, कासारवेली, जयगड) या बंदरात नांगरून ठेवलेल्या आहेत. तरी अशा नौकांवर कायदेशीर कारवाई करावी अशा मागण्या केल्या आहेत.