वैभवववाडी-कोल्हापूर रेल्वेसाठी केंद्राने तीन हजार २४४ कोटींची तरतूद केली आहे. तेवढीच रक्कम राज्य शासन आपल्या अर्थसंकल्पात करणार आहे. आचारसंहिता संपताच भूसंपादनाचे काम सुरू होईल. या रेल्वे मार्गामुळे कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘केंद्रीय अर्थसंकल्पात कोकणच्या विकासाला चालना देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात मच्छीमारांसाठी नवीन तलाव, नारळ प्रोत्साहन योजना, काजूला जागतिकस्तरावर नेण्यासाठी प्रीमियम ब्रँड तयार करणे आदींचा समावेश आहे. ‘राणे म्हणाले, ‘वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग गेली अनेक वर्षे रखडला होता. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी या प्रकल्पासाठी केंद्राने तीन हजार २४४ कोटी निधीची तरतूद केली आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग पूर्णत्वानंतर कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राला जोडली जाणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीचे नवे दालन खुले होणार आहे.
अनेक नवीन उद्योगांची उभारणी होणार आहे. या रेल्वे मार्गाला पुढील काळात बंदरही जोडली जाणार आहेत. त्यामुळे किनारपट्टी संपूर्ण देशाशी रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहे. याखेरीज अनेक नवे उद्योग इथे प्रस्तावित आहेत. आचारसंहिता बंधन असल्याने त्याबाबत अधिक काही सांगू शकत नाहीत; मात्र या रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वानंतर तसेच नवीन उद्योग, व्यवसाय उभारणीनंतर मुंबई, पुणे, गोवा येथे रोजगारासाठी गेलेले तरुण पुन्हा सिंधुदुर्गात येतील.’ते म्हणाले, ‘जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लगेचच रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू होईल, तर २०२८ अखेरपर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. केंद्राने मच्छीमारांसाठी पाचशे नवीन तलावांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. याखेरीज खोल समुद्रात पकडलेले मासे करमुक्त करणे, नारळ लागवडीसाठी नारळ संवर्धन योजना आणली आहे.’
असा आहे मार्ग – वैभववाडी-कोल्हापूर या नियोजित रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण २०१६ मध्ये जे. पी. इजिनिअरिंग या खासगी कंपनीकडून करण्यात आले होते. त्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार हा नियोजित रेल्वेमार्ग वैभववाडी, सोनाळी, कुंभारवाडी, कुसुर, उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी (ता. वैभववाडी), सैतवडे, कळे, भुये, कसबा बावडा, मार्केट यार्ड कोल्हापूर असा आहे.
२६ बोगदे, ५ उड्डाणपूल, १० स्थानकांचा समावेश – वैभववाडी-कोल्हापूर हा १०६ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग असणार आहे. या रेल्वेमार्गावर दहा रेल्वेस्थानक असणार आहेत. हा रेल्वेमार्ग करताना डोंगररांगांचा मोठा अडसर आहे. त्यामुळे बोगदे करावे लागणार आहेत. सर्वेक्षणानुसार या रेल्वेमार्गावर २६ बोगदे आणि पाच उड्डाणपूल उभारावे लागणार आहेत.

