एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होत असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांचे श्राद्ध घालून त्यांच्या नावाने मुंडन करण्याचा इशारा मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने देण्यात आला आहे. तत्पूर्वी संपूर्ण कोकणवासीयांचे आणि मंत्रीमहोदयांचे या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी २ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि मुंबईकर कोकणवासीयांना खाचखळग्यातून करावा लागणारा प्रवास याचे विदारक सत्य जनतेसमोर यावे यासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली.
अॅड. यशवंत गंगावणे, अॅड. योगिता सावंत, सचिव रुपेश रामचंद्र दर्गे, सुभाष सुर्वे, काडगे, संदीप विचारे, समीर टाकले, संजय सावंत तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. रुपेश रामचंद्र दर्गे यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील १४ वर्षांपासून चालू असून अद्यापही पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मे २०२३ पर्यंत एक मार्गिका पूर्ण करू असे पाहणी दौऱ्यावेळी आश्वासन दिले होते, परंतु ते आश्वासन पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. गणेशोत्सव काही दिवसांवर असताना अद्यापही कासू ते इंदापूर या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. हे काम जरी केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असेल तरी मुंबई-गोवा महामार्गाबाबत शासन, प्रशासन व ठेकेदार अद्यापही दखल घेताना दिसत नाहीत. पळस्पे ते रत्नागिरीपर्यंत अद्यापही अनेक ठिकाणी महामार्गाचे काम रखडलेले आहे.
याचा त्रास वाहन चालक आणि कोकणकरांना सहन करावा लागत आहे. डिसेंबरपर्यंत देखील महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती दिसत नाही. यासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समि तीतर्फे कोकणवासीयांसह अधिवेशन काळात (२ ऑगस्ट २०२३) आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सरकारच्यावतीने समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास समस्त कोकणवासिय गणेशोत्सवापूर्वी पळस्पे ते झाराप रास्तारोको आंदोलन करून जोपर्यंत अधिकारी, लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेण्यात येईल. कोकणामध्ये गणेशोत्सवाच्या अगोदर हा रस्ता झालाच पाहिजे अन्यथा नितीन गडकरी मुंबईत किंवा महाराष्ट्र कुठे मिटिंग घेतील तेथे काळे झेंडे दाखवु असा इशारा सुभाष सुर्वे यांनी दिला.