सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘जनसुरक्षा’ योजनांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा अग्रणी बँकेने प्रसिद्ध केलेल्या सप्टेंबर २०२४ आणि सप्टेंबर २०२५ च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार, कोकणातील नागरिक आता बचतीसोबतच विमा संरक्षणालाही प्राधान्य देत असल्याचे सुखद चित्र समोर आले आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेने जिल्ह्यात सर्वाधिक प्रगती केली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ६ लाख ५ हजार २६७ असलेल्या विमाधारकांची संख्या सप्टेंबर २०२५ मध्ये ७ लाख ४५ हजार ३१४ वर पोहोचली आहे. केवळ २० रुपयांच्या वार्षिक हप्त्यात २ लाखांच्चे अपघात विमा कवच देणाऱ्या य योजनेने जिल्ह्यात एका वर्षात १.४० लाखांहून अधिक नवीन सदस्य जोडले आहेत. राष्ट्रीय स्तरावरही या योजनेने ५१ कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा पार केला असून, ग्रामीण भागातील असुरक्षित कुटुंबांना आधार देण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे.
पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेच्या लाभार्थ्यांमध्येही ३४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कोणत्याही कारणास्तव मृत्यू जनसुरक्षा योजनांना जिल्ह्यात प्रतिसाद देणाऱ्या या योजनेत ओढवल्यास वारसाला दोन लाखांचे आर्थिक सहाय्य जिल्ह्यातील सभासद संख्या १ लाख ८६ हजार १८ वरून २ लाख ४९ हजार २०७ इतकी झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर १० वर्षे पूर्ण करणाऱ्या या योजनेने आतापर्यंत ९ लाखांहून अधिक कुटुंबांना विम्याचा लाभ मिळवून देत सामाजिक सुरक्षेचे जाळे घट्ट केले आहे; मात्र, गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान जनधन योजनेच्या खात्यांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ४ लाख २७ हजार ५०५ असलेली खाती सप्टेंबर २०२५ मध्ये ४ लाख १ हजार ८८ पर्यंत खाली आली आहेत. राष्ट्रीय स्तरावरही काही ठिकाणी ‘इनऑपरेटिव्ह’ किंवा निष्क्रिय खात्यांचे प्रमाण वाढल्याने केंद्र सरकारने ‘रि-केवायसी’ मोहीम हाती घेतली आहे.
रत्नागिरीत खात्यांची संख्या घटण्यामागे दुबार खाती बंद होणे किंवा केवायसीअभावी खाती बंद होणे ही तांत्रिक कारणे आहेत. असे असले तरी, जनधन खात्यांमुळे थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली असून, भ्रष्टाचाराला आळा बसण्यात मोठे यश मिळाले आहे. एकूणच, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे आणि बँकांच्या व्यापक मोहिमांमुळे रत्नागिरीतील आर्थिक साक्षरता वाढत असल्याचे चित्र आहे. ‘सुरक्षित भविष्यासाठी विमा’ ही संकल्पना आता कोकणातील गावागावांत रुजू लागली आहे.

