पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे अखेर उद्घाटन पार पडले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी दिव्यांग मुलांसोबत प्रवास केला. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांनी आस्थेने विचारपूस केली. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती आपल्यासोबत अशी दिलखुलास गप्पा मारते, हे पाहून विद्यार्थी देखील आनंदी होऊन अक्षरशा भारावून गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पुणे मेट्रोचे एकूण अंतर हे ३२.२ किमी आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा १२ किलोमीटरच्या पट्ट्याचा प्रवास केला. या प्रवासासाठी सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम पंतप्रधानांनी मेट्रोचे तिकीट खरेदी केले आणि त्यानंतरच त्यांनी मेट्रोमधील प्रवास सुरु केला. एक सूचक संदेशच पंतप्रधान मोदींनी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी दिला आहे तो म्हणजे, प्रत्येकाने तिकीट खरेदी करूनच मेट्रोचा प्रवास करावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी तीन ते रात्री नऊ या सहा तासासाठी नागरिकांना मेट्रो प्रवासासाठी खुली झाली. त्यामुळे दुपारपासून सर्वच स्टेशनवर नागरिकांची गर्दी होती. मेट्रोच्या जवळपास सर्वच फेऱ्या हाऊसफूल झाल्या होत्या. पहिल्याच दिवशी दोन्ही मार्गावर २२ हजार ४३७ पुणेकरांनी मेट्रोच्या सफरीचा आनंद लुटला. यातून महामेट्रोला दिवशी ५ लाख ५३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.