मुंबईकर चाकरमानी खासगी वाहनांमधून गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले. आहेत. बहुसंख्य वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच सीएनजी पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. चिपळूणमधील तिन्ही पंपांवर काही तासात सीएनजी संपत आहे. त्यामुळे वाहन चालकांना पंपाच्या बाहेर रांगा लावून प्रतीक्षा करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणावर सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. शहरालगत वालोपे, बहादूरशेख चौक, शिवाजीनगर एस.टी. स्थानक या ठिकाणी एकूण तीन सीएनजी पंप आहेत.
सावर्डे मध्ये देखील एक पंप आहे. मात्र, सध्या सीएनजीचा पुरवठा कमी पडत असून निदान गणेशोत्सवासाठी मध्यवर्ती असणाऱ्या चिपळूणमध्ये सीएनजीचा पुरवठा चोवीस तास हवा. म्हणजे चाकरमान्यांना रांगा लावून प्रतिक्षा करावी लागणार नाही. अशी मागणी चाकरमानांकडून केली जात आहे. सद्यस्थितीत सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. चिपळूण शहरात सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षा आणि वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरातील ३४२ रिक्षा या सीएनजी व चालतात. तालुक्यात शेकडो वाहने सीएनजी वर चालतात. ग्रामीण भागातील रिक्षा आणि चार चाकी वाहने सीएनजी भरण्यासाठी चिपळूण ला येतात. मात्र सध्या सीएनजी पंपावर चाकरमानांच्या वाहनांची गर्दी होत असल्याने वाहन चालकांना सीएनजीच्या प्रतीक्षेत प्रतीक्षेत तासंतास थांबावे लागते.