दादर येथील कबुतरखान्यावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलक जमले. त्यांनी तेथील कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. काही यानंतर आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही, आंदोलकांनी आतमध्ये शिरून राडा घालायला सुरुवात केली. त्याचबरोबर सोबत आणलेलं कबुतरांसाठीचे खाद्यदेखील त्यांनी तिथे पसरवून टाकले. दरम्यान, कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री आंदोलकांनी काढल्यानंतर तिथे झाकण्यासाठी केलेले लाकडी बांबूंचे बांधकामदेखील आंदोलकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. मात्र, पोलिसांनी वारंवार सांगितल्यानंतरदेखील आंदोलकांनी कबुतरखान्याजवळ तोडफोड करत आतमध्ये प्रवेश केला. दरम्यान, दादरला जमलेल्या आंदोलकांनी कबुतरखान्यांसाठीचे आंदोलन कधी स्थगित झालेच नव्हते, असा दावा केला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारच्या पुढील कार्यवाहीसाठी हे आंदोलन स्थगित झाल्याचे सांगितले जात होतं. मात्र, असे काहीही झालेले नसून अशी अफवा राजकीय हेतूने पसरवण्यात आल्याचा दावा काही आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत हे कबूतर उपाशी मरणार का? असा सवालही आंदोलकांकडून करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला मंगलप्रभात लोढाही होते. दादर कबुतरखान्याशी संबंधित एक संघटना आहे. त्या संघटनेचेही सदस्य होते. यातून मार्ग निघावा अशी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी त्यात घेतली होती. हा पशूपक्ष्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. यात राजकारण आणण्याचं कारण नाही. पक्ष्यांवर प्रेम दाखवणं ही आपली परंपरा आहे. पण त्यातून काही आजार उद्भवू नये हेही खरं आहे. काहींचं असं म्हणणं आहे की कबुतरांमुळे खरंच आजार होतात का? यावरही संशोधन करा.
जसं सुरुवातीच्या काळात करोना आला तेव्हा सगळ्याच गोष्टी करोनामुळे होत नव्हते. काहींना इतर आजारही होते. पण काही घडलं तर करोनामुळे मृत्यू झाला असं बोललं जायचं. मोठ्या रुग्णालयांकडून यावर मतं घ्यावी लागतील. कारण कबुतर काही आज मुंबईत आलेले नाहीत. पूर्वीपासून मुंबईत कबुतर होते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. जसं नागरिकांना राहण्या-खाण्याचा अधिकार आहे, तसाच पशू-पक्ष्यांना त्यांच्यासाठीच्या भागात राहण्याचा-जगण्याचा अधिकार निसर्गानं दिला आहे. जैन समाज व इतर व्यक्तींच्या भावना कालच्या बैठकीत काहीशा तीव्र होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या परिसरात मोठ्या संख्येन कबुतरखाने आहेत. पण काहींचं अस म्हणणं आहे की कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार पसरतात. शेवटी न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. यात सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे सगळ्यांना समजावत सांगितलं असंही अजित पवार माध्यमांना म्हणाले.