शहरातील सात पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि रेडिओग्राफी चाचणीमध्ये दोन पुतळ्यांमध्ये किरकोळ दोष आढळला आहे. त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना कोल्हापूर येथील एजन्सीने केली आहे. पालिकेने याबाबत जे. जे. स्कूल ऑफ आर्टला कळवले असून, लवकरच त्या पुतळ्याची दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला. या चाचणीचा अहवाल नुकताच पालिकेला प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा गंभीर प्रकार घडला. त्यावर राज्यातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी पालिकेच्या हद्दीतील ७ पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यांची रेडिओग्राफी चाचणी करण्यात आली.
रेडिएशनद्वारे त्या पुतळ्याला काही भंग झाला आहे का, कुठे जीर्ण झाला आहे, हे तपासले. रेडिएशनमुळे पूर्वसूचना देऊन पहाटेवेळी ही चाचणी केली होती. त्याच्या अहवालानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये दोष होता; परंतु स्ट्रक्चर आणि पुतळ्याचे मजबुतीकरण करण्यात आले. मारुती मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये किरकोळ दोष आढळला आहे. त्याची दुरुस्ती करण्याबाबत जे. जे. स्कूल ऑफ आर्टला कळवण्यात आले आहे. लवकरच ती दुरुस्ती करण्यात येणार आहे.
या पुतळ्यांची झाली रेडिओग्राफी – जिजामाता उद्यान येथील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, तेथीलच जिजामाता आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, मारुती मंदिर येथील शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, शिर्के उद्यानमधील विठ्ठलाची मूर्ती, सिव्हिलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, लक्ष्मी चौकातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा पुतळा यांची रेडिओग्राफी झाली.