खेड तालुक्यातील खोपी गावातून सुरू होणारा रत्नागिरी व सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट २० जुलैपासून पर्यटनासाठी प्रशासनाने बंद केला आहे. पर्यटकांनी हा बंदी आदेश मोडून जाऊ नये, यासाठी आता खेड पोलिसांनी रघुवीर घाटाच्या पायथ्याशी बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे या घाटाकडे जाणाऱ्या अनेक पर्यटकांना माघारी परतावे लागत आहे. पावसाळ्यात या घाटात स्थानिकांसह मुंबई, पुणे येथील पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी येतात. मात्र, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत घाटात अनेक ठिकाणी दगड व माती ढासळली होती.
यावर्षी एक दोन ठिकाणी दगड ढासळण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, अद्याप दरड कोसळण्याची घटना घडलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपी गावातून सुरू होणाऱ्या या घाटातील दहा किलोमीटर परिसरातील रस्त्यावर काही ठिकाणी काम केले आहे. अद्याप घाटात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. मात्र, पावसाचा वाढता जोर आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन खेडच्या या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी २० जुलै रोजी आदेश काढून घाट पर्यटनासाठी बंद केला आहे. बंदीनंतर पहिल्याच रविवारी पोलीस प्रशासनाने ठेवलेल्या बंदोबस्तामुळे अनेक पर्यटकांना माघारी परतावे लागले.