एसएई इंटरनॅशनल एरो डिझाईन चॅलेंज २०२२ वेस्ट या कॅलिफोर्निया, अमेरिका येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये अलिबाग तालुक्यातील शहापूरचा सुपुत्र रतिश संतान पाटील याने पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांतून ‘गरुडाश्व’ या एरोनॉटिकल टीममध्ये डिझाईन डिपार्टमेंटचे नेतृत्व केले. या स्पर्धेत त्याने केलेल्या वणवे विझविण्यासाठी पाणीवाहू विमानाच्या केलेल्या डिझाईनमुळे जागतिक स्तरावर भारताला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या त्याच्या डिझाईनमुळे जगभरातील जंगलांना लागलेले वणवे रोखण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.
शहापूर येथील संतान सुदाम पाटील व यशोदा संतान पाटील या दांपत्याचा रतिश हा पुत्र असून तो ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे येथे मेकॅनिकल शाखेत तिसर्या वर्षात पदवी घेत आहे. एरोनॉटिकल या क्षेत्रात त्याचे विशेष प्राविण्य आहे. दिनांक ८ ते १२ एप्रिल २०२२ ला एसएई इंटरनॅशनल एरो डिझाईन चॅलेंज २०२२ वेस्ट ही स्पर्धा कॅलिफोर्निया, अमेरिका येथे पार पडली.
या स्पर्धेत जगातील ७० देशाच्या विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. त्यात भारतातील पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालयातून ’गरुडाश्व’ या एरोनॉटिकल टीममध्ये डिझाईन डिपार्टमेंटचे रतिश संतान पाटील याने नेतृत्व केले. रतिश याने १२ फूट लांबीचे रेडिओ कंट्रोल्ड विमानाचे डिझाईन केले. हे विमान बॅटरी पॉवरने चालणार असून ट्रान्समीटरद्वारे त्याचे नियंत्रण करण्यात येणार आहे.
एका फेरीमध्ये हे विमान ८ लिटर पाण्याची वाहतूक करु शकणार आहे. या विमानाद्वारे जंगलातील पेटलेले वणवे विझवण्यासाठी पाण्याची वाहतूक करण्यात येणार आहे. एक विमान बारा वेळा उड्डाण करुन ९६ लिटर पाण्याची वाहतूक करुन जंगलातील वणव्यांवर पाण्याची फवारणी करुन आग नियंत्रित करण्यास मदत होऊ शकेल.
जागतिक पातळीवर अशी ३ लिटर पर्यंत पाण्याची वाहतूक करणारी विमाने उपलब्ध आहेत. परंतु रतिशने ८ लिटर पाणी वाहून नेणार्या विमानाचे डिझाईन बनविल्यामुळे जागतिक पातळीवर आग विझविणार्या यंत्रणांसाठी ते एक प्रकारे वरदान ठरले आहे. त्याच्या या डिझाईनमुळे जागतिक स्तरावर भारताला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ग्रामीण भागातील रतिशने हे यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.