रायगड जिल्ह्यात राजकीय भूकंप होत असताना जमीन हादरवून टाकणाऱ्या खऱ्याखुऱ्या भूकंपाचा प्रत्यय रायगडकरांना बुधवारी रात्री आला, आणि साऱ्यांचीच धावपळ उडाली. बुधवारी रात्री रायगडातील सुधागड व पेण तालुक्यातील डोंगर पट्ट्यात लोक गाढ झोपेतं असताना अचानक भूकंपसदृश्य हादरे बसून धडकी भरविणारा आवाज झाला. गुरुवारी दुपारीही अचानक भूकंपाचे हादरे बसले, आणि साऱ्यांची पाचावर धारण बसली. भूकंपाची तीव्रता सौम्य असली तरी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. हा भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला अन् त्याचा केंद्रबिंदु कोणता होता? याबाबत कोणताही अचूक माहिती मिळालेली नाही. रात्री लोक झोपेत असतानाच अचानक रायगड जिल्ह्यात भूकंपाचे हादरे जाणवले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागली, खिडक्या, काचा हादरू लागल्या, त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात पेण आणि सुधागड तालुक्यात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
सुधागड तालुक्यातील महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी आणि पेण तालुक्यातील तिंलोरे, वरवणे भागात जमिनीला हादरे बसले. भूकंपाचे हादरले जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. त्यामुळे रायगडमधील बऱ्याच गावात रस्त्यांवर अचानक मोठी गर्दी झाली. बुधवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रायगडमधील पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे हादरे जाणवले. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांनी गावांना भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करून धीर दिला. पेण आणि सुधागडमध्ये जमिनीलाहादरे बसून भूगर्भातून आवाज आला, घरातील भांडी हलली, इतर कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पण अचानक आलेल्या भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेत स्थळावर याची नोंद नाही. जिओलोजिकल सव्र्व्हे ऑफ इंडिया, संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.
सुधागड व पेण तालुक्याच्या सीमेअंतर्गत असणाऱ्या गावांना रात्रीच्या सुमारास हादरे बसले. १५ मिनिटांच्या अंतराने ६ हादरे जाणवले. यामध्ये जमीन हादरताना भांडी पडली. जमीन हादरली तसेच मोठ्या प्रमाणात आवाज झाला. तर पहाटे पाचच्या सुमारास २ हादरे झाले. हे सर्व कशामुळे घडते आहे याचा अचूक अंदाज लावणे कठीण होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात अनेक शंका व भय निर्माण झाले आहे. नागरिकांना आपल्या घरात राहणे यासाठी सुरक्षितता वाटावी यासाठी तालुका प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी या घटनेचा खोलवर तपास करून निष्कर्ष काढावा अशी मागणी महागाव माजी सरपंच भास्कर पार्टे यांनी केली आहे. सुधागड आणि पेण तालुक्यातील डोंगर पट्ट्यातील महागाव व इतर काही गावात रात्री जमीन हादरली.