तालुक्यातील रिळ आणि उंडी गावामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्र जाहीर केले आहे. यामध्ये दोन्ही गावांची मिळून ५१३ एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी खातेदारांना नोटिसा देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली “आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी याला दुजोरा दिला. रिळ आणि उंडी औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना नुकतीच जारी केली. यामध्ये १५२.९५ हेक्टर रिळची, तर उंडीतील ६०.४० हेक्टर अशी एकूण २१३. ३५ हेक्टर म्हणजे ५१३ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. संपादित होणाऱ्या क्षेत्राचा शासकीय दराच्या ४ पट वाढीव मोबदला मिळणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात याबाबत चौकशी केली असता रिळ गावातील १३६ सातबारावरील १५३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे.
उंडी गावामध्ये ४९ सातबारा भागांवरील ६० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या सर्व जमीन मालकांना शासकीय मुल्याच्या चारपटएवढा मोबदला मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने याबाबत महसूल विभागाला कळवले आहे. भूसंपादन कायदा २०१३च्या कलम २६ ते ३०दरम्याने नमूद केलेल्या तरतुदीप्रमाणे मोबदला परिगणना करण्यात यावा. हा मोबदला जमीन मालकांना देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने दाखवली आहे. खंडाळा हा परिसर औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे. आता नवा प्रकल्प एमआयडीसीच्याद्वारे येत आहे.
६० टक्के जमिनी विकल्या – रिळ आणि उंडी येथील सुमारे ५० ते ६० टक्के जमिनी स्थानिकांनी विकल्या आहेत. त्यामुळे मूळ मालकांऐवजी आता जमीन खरेदी करणाऱ्यांना या औद्योगिक क्षेत्रा क्षेत्राचा फायदा होणार आहे. त्यांना शासकीय मूल्याच्या ४ पट अधिक दर मिळणार आहे.