तालुक्यातील रिळ-उंडी एमआयडीसी व्हावी, अशी मागणी एकाही ग्रामस्थाने प्रशासनाकडे केलेली नाही. एमआयडीसी आल्यास गावाचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात येईल, इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल. प्रदूषित कारखान्यांमुळे गावातील पारंपरिक व्यवसाय, उद्योगधंदे धोक्यात येतील. यामुळे रिळ-उंडी एमआयडीसी रद्द करण्याची अधिसूचना राज्य सरकारने तातडीने काढावी; अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय रिळ-उंडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला. गुरुवारी (ता. ३) रिळ-उंडी एमआयडीसीबाबत निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते.
ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत एमआयडीसी उभारण्यास कडाडून विरोध केला. यापूर्वी २२ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत एमआयडीसीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे गावातील पाण्याचे स्रोत प्रदूषित होतील, असे कोणतेही उद्योग गावात सुरू करू नयेत, अशी भूमिका घेतली होती. यानंतर प्रशासनाने जमीन मालकांना ३२-२ च्या नोटिसा दिल्यानंतर हरकती नोंदवून न घेताच घाई गडबडीत जमीन मोजणीला सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रकल्पाबाबत जनसुनावणी देखील गावात न घेता प्रांताधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली.
जनसुनावणी झाल्यानंतर कोणतीही मुदत न देता आणि ग्रामस्थांना नोटिसा देखील पोहोचल्या नसताना मोजणीला सुरुवात झाली. युद्ध पातळीवर जमीन मोजणी पूर्ण करण्यात आली. प्रकल्प येण्यापूर्वीच काही परप्रांतियांनी या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करून ठेवल्या असून यामागे शासनाचा पैसा लाटण्याचा डाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांना रोजगाराचे गाजर दाखवून परप्रांतियांना गब्बर करण्याचे काम सुरू आहे.
संभावित धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रिळ-उंडी येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द केल्याची अधिसूचना तत्काळ काढावी, अशी मागणी विशेष ग्रामसभेत केली. अधिसूचना न काढल्यास येणाऱ्या विधनसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
प्रदूषणाचा धोका संभवतो – गावात मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळ बागायती आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रिळ-उंडी गावात मजुरी स्वरुपात रोजगार उपलब्ध आहे. रिळ- उंडी गावाला मोठा समुद्रकिनारा लाभला असून, त्या माध्यमातून पर्यटनाच्या स्वरुपात रोजगार उपलब्ध आहेत. त्यामुळे रिळ-उंडी गावात एमआयडीसी अंतर्गत प्रदूषणकारी प्रकल्प आल्याने रिळ उंडी येथे जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण होण्याचा धोका असल्याचे विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.