काही तांत्रिक बिघाडामुळे गेल्या आठवडाभरापासून राजापूर पोस्ट कार्यालयातील कोकण रेल्वेची आरक्षण सुविधा खंडित झाली होती; मात्र, तांत्रिक बिघाड दूर करण्यात पोस्ट विभागाला यश आल्याने ही आरक्षण सुविधा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करू इच्छीणाऱ्या राजापूरवासीयांना आरक्षण सुविधेअभावी प्रवासासाठी सीट आरक्षित करण्यामध्ये झालेली गैरसोय आता दूर झाली आहे. कोकण रेल्वेमार्गावर विस्ताराने मोठ्या असलेल्या राजापूर तालुक्यासाठी सोल्ये येथे ‘राजापूर रोड’ हे एकमेव स्थानक असून त्याच्या जोडीने सौंदळ येथे व्हॉल्टस्टेशन आहे. शहरापासून सुमारे १८ ते २० किमी असलेल्या या स्टेशनवर जाऊन रेल्वे आरक्षण करणे प्रवाशांसाठी खर्चिक बाब ठरत होती. त्यामुळे राजापूर पोस्ट कार्यालयात आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले.
या केंद्राचा अनेक रेल्वे प्रवाशांनी लाभ घेतला आहे; मात्र सुमारे वीस दिवसांपूर्वी पोस्ट कार्यालयातील हे केंद्र तांत्रिक कारणास्तव बंद होते. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देणे अशक्य झाले होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. रेल्वे आरक्षण केंद्र कार्यरत राहण्यामध्ये आलेला तांत्रिक बिघाड दूर करून रेल्वे आरक्षण सेवा सुरळीतपणे सुरू झाली आहे. तशी माहिती पोस्ट कार्यालयातून स्थानिक पातळीवर देण्यात आली. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कार्यालयात मार्गदर्शक फलक हवा – राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले असले तरी त्याची सर्वसामान्य माहिती व्हावी या दृष्टीने पोस्ट कार्यालयाबाहेर कोणताही मार्गदर्शक फलक लावलेला नाही. त्यामुळे आरक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांना नाहक इकडे तिकडे फिरावे लागत आहे. सर्व प्रवाशांसह ग्रामस्थांना माहिती मिळेल, असा रेल्वे आरक्षण सुविधा केंद्राचा फलक पोस्ट कार्यालयाबाहेर लावण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.