कोरोना काळानंतर बऱ्याचशा कोकण रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या पूर्ववत सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना हा रेल्वेचा प्रवास पुन्हा सुरु झाल्याने, दिलासा मिळाला आहे. परंतु, जरी हा प्रवास पूर्ववत झाला असला तरी, या प्रवासा दरम्यान घडणाऱ्या चोरीच्या घटनाना देखील सुरुवात झाली आहे. मोबाईल, पैसे, पॉकेट, किमती वस्तू, दागिने, बॅग चोरण्याच्या रोजच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या चोरांना पकडणे पोलिसांसाठी देखील एक प्रकारचे आव्हानच ठरत आहे.
कोकण रेल्वेमध्ये सध्या वारंवार चोरीच्या घटना घडून येत आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानक ते भोके रेल्वे स्थानकाच्या प्रवासा दरम्यान वृध्द महिलेचे १८ हजार ८०० रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना २६ मार्च रोजी घडली होती. याबाबतची फिर्याद गिता निवलेकर वय ५२, रा. मुंबई यांनी १७ मे रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवलेकर या मेंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत करत होत्या. भोके रेल्वे स्थानकादरम्यान त्यांची बॅग अज्ञात चोरटयाने लांबवली. या बॅगेत १८ हजार रुपये किंमतीची सोन्याची कर्णफुले, ८०० रुपये किंमतीची रोख रक्कम असा एकूण १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञातावर भादविकलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक वेळा वृद्ध प्रवास करत असतील तर, अशा व्यक्तींशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन करून अशा लोकांची लुट करण्यात येते. काही वेळा त्यांच्या झोपेच्या वेळी, किंवा रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन त्यांच्या कडील किमती सामान घेऊन चोर पोबारा करतात. या घटनांना आळा बसणे गरजेचे आहे.